लग्न नको म्हणून नक्षलवादी बनलेल्या तरुणीचं लग्नासाठी आत्मसमर्पण
सविताने आतापर्यंत 14 चकमकीत भाग घेतला आहे. चार हत्यांचे आरोपी तिच्यावर आहेत. जामभुलखेडा प्रकरणात ती सामील होती, ज्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते.
गडचिरोली : प्रेमाची ताकत खुप जास्त असते. याचं उदाहरण म्हणजे सविता नरोटी. अवघ्या 20 वर्षांची तरुणी, पण तिच्यात आणि सामान्य तरुणींच्या आयुष्यात खुप फरक आहे. वयाच्या अगदी कोवळ्या वयात म्हणजे 13 वर्षांची असताना सविता माओवादी दलममध्ये शामिल होऊन, खांद्यावर बंदूक घेऊन जंगलात वास्तव्य करायला लागली. त्यासाठी तिने घरही सोडलं होतं. पण ती आता मुख्य प्रवाहात परतली आहे, तेही फक्त प्रेमासाठी!
सविता उर्फ करिष्मा उर्फ गंगा नरोटी. दिसायला अगदी लहान. पण गेली 7 वर्ष हीच तरुणी अनेक नक्षल चळवळींचा भाग राहिली आहे. आज वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तिने गडचिरोलीत सीआरपीएफ फोरसेसच्या माध्यमातून आत्मसमर्पण केले आहे. आपले घर असणाऱ्या जंगलातील हिंस्त्र आयुष्याला रामराम ठोकला आहे. मात्र सविता ही हसायचे खेळायचे दिवस असणाऱ्या 13 व्या वर्षात नक्षल चळवळीत कशी अडकली?
आई-वडीलांचा मृत्यू झाल्यानतंर सविता काकांकडे राहत होती. अवघ्या 13 व्या वर्षी काकाने तिचं लग्न ठरवलं. मात्र सविताला एवढ्यात लग्न करायचे नव्हते. त्यामुळे यातून सुटकेसाठी ती नक्षली चळवळीत सामील झाली. मात्र आता ती परत आली आहे, तेही लग्न करण्यासाठीच.
सविताचा रक्तरंजित इतिहास
- सविताने आतापर्यंत 14 चकमकीत भाग घेतला आहे.
- चार हत्यांचे आरोपी तिच्यावर आहेत.
- जामभुलखेडा प्रकरणात ती सामील होती, ज्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते.
- तिच्यावर दोन 2 लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते.
गडचिरोलीत नवीन तरुण फारसे नक्षलवादाकडे येत नाहीये. त्यात मध्यंतरी बराच फटका बसला म्हणून चळवळीने छत्तीसगढहून माववादी गडचिरोलीत, महाराष्ट्रात पाठवले. यामध्ये सविता चातगाव दलममध्ये सामील झाली. मात्र तिथे एका गावात, गट्टा जामबीयात येता जाताना सविताची भेट झाली एका तरुणाशी झाली जो गडचिरोलीत एका फॅक्टरीत काम करतो. दोघेही प्रेमात पडले आणि लग्न नको म्हणून नक्षल चळवळीत आलेल्या सविताने आता लग्न हवे म्हणून तीच चळवळ सोडली आणि आत्मसमर्पण केले आहे.