तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी आलुरे गुरूजी यांचं निधन
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचे आज पहाटे निधन झालं असून ते 99 वर्षांचे होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 नंतर अणदूर या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. आलुरे गुरुजींची शिक्षणमहर्षी अशी ख्याती होती. गेल्या बऱ्याच काळापासून गुरुजी आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरच्या अश्विनी रूग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचे आज पहाटे निधन झालं. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी गुरुजींची ओळख होती. तसेच आलुरे गुरुजींची शिक्षणमहर्षी अशी ख्याती होती. 1980 साली ते आमदार होते. अणदूर परिसरात त्यांनी एकूण 28 शाळा सुरु केल्या आहेत. तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्ष होते. शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव म्हणूनही त्यांना काम पाहिलं होतं.
आलुरे गुरुजींचा जन्म 6 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीडच्या पाटोदा तालुक्यात त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरु केलं होतं. त्यानंतर ते अणदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू झाले होते. तिथूनच ते मुख्याध्यापक म्हणून 1990 साली निवृत्त झाले. शिक्षण प्रसारक मंडळामार्फत आलुरे गुरुजी यांनी अणदूर आणि त्याच्या ग्रामीण परिसरात विविध गावांत 28 शाळा सुरु केल्या.
सिद्रामप्पा आलुरे हे 1980 मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले. त्यांनी शेकापचे तत्कालीन आमदार माणिकराव खपले यांचा 14 हजार 579 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता. 1980 च्या निवडणुकीत त्यावेळी आलुरे याना 34 हजार 121 तर खपले यांना 19 हजार 542 मते पडली होती. 1985 ला मात्र शेकापचे माणिकराव खपले पुन्हा एकदा निवडून आले होते. त्यांनी आलुरे यांचा 11 हजार 230 मतांनी पराभव केला होता. 1985 साली शेकापचे खपले यांना 42 हजार 553 तर काँग्रेसचे आलुरे यांना 31 हजार 323 मते मिळाली होती.