Milind Deora : माजी खासदार मिलिंद देवरांनी अखेर राजकीय 'देवारा' बदलला; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश
Milind Deora : काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील नेते आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख आहे.
![Milind Deora : माजी खासदार मिलिंद देवरांनी अखेर राजकीय 'देवारा' बदलला; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश former minister Milind Deora joined the Shinde group in the presence of Chief Minister Eknath Shinde along with 10 former corporators Milind Deora : माजी खासदार मिलिंद देवरांनी अखेर राजकीय 'देवारा' बदलला; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/9223686ba034c1a7fb1c6716b4f543a31705226814151736_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर 'माजी'च राहण्याच्या शक्यतेनं नाराज झालेल्या माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर राजकीय देवारा बदलला आहे. काँग्रेसकडून (Congress) माजी मंत्री राहिलेल्या देवरा यांनी 10 माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी देवरांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे गटातील अनेक नेते देवरांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी देवरांसोबत 10 माजी नगरसेवकांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला. देवरा यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला दिल्लीमध्ये चेहरा मिळाला आहे. त्यांच्या प्रवेशासाठी खासदार श्रीकांत शिंदे आग्रही होते, अशी माहिती आहे.
शिंदेंचा 'हात' पकडताच काँग्रेस आणि ठाकरे गटावर कडाडून हल्लाबोल!
पक्षप्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर कडाडून हल्लाबोल केला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रेससोबत होतो. माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजची काँग्रेसमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी यांनी सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केलं असतं तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावं लागलं नसतं. असा कार्यक्रम होत असताना कुणाला तरी नजर लावायची असते.
मोदींना विरोध एवढच आजच्या काँग्रेसला माहिती
ते पुढे म्हणाले की, आजच्या काँग्रेसला मोदींना विरोध एवढच आजच्या काँग्रेसला माहिती आहे. मी पक्ष सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं, पण आज माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षांचं नातं मी तोडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं व्हिजन मोठं आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचंही देशासाठीचं व्हिजन मोठं आहे. यांचे हात मला बळकट करायचे आहेत. बाळासाहेब माझ्या वडिल मुरली देवरांना महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी एकनाथ शिंदेंनी मला प्रवेशाचं आमंत्रण दिलं. खासदार होऊन मी मुंबई आणि महाराष्ट्राचा चांगला विकास करु शकतो.
हा ट्रेलर आहे पिक्चर आणखी बाकी
देवरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकना शिंदे यांनीही तोफ डागली. ते म्हणाले की, एक, अभ्यासू सयंमी नेता आपल्यामुळे मिळाला आहे. हा ट्रेलर असून पिक्चर आणखी बाकी आहे. मी, सकाळी उठून रस्ते धुण्याचे काम करतो, त्यामुळे चहल सुद्धा हातात झाडू घेतो आणि आमदार सुद्धा घेतात. मी दीड वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. गावी जाऊन सुद्धा काम करतो. मी शेतात जातो काम करतो जनता दरबार घेतो. वेळ कमी असल्यामुळे मी हेलिकॉप्टरमधून जातो आणि वेळ वाचवतो. मी हेलिकॉप्टरमधून फोटो काढत नाही. काही लोक काल कल्याण लोकसभेत गेले होते. आता निवडणुकीत यांना साफ करा म्हणाले. लोक लोकांची कामे करणाऱ्याला कसे साफ करतील? घरात बसणाऱ्याला साफ करतील.
मिलींद देवरांसह आज वर्षावर शिंदे गटात कोणाकोणाचा प्रवेश झाला?
- सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष
- प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक
- सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक
- रामवचन मुराई , माजी नगरसेवक
- हंसा मारु, माजी नगरसेवक
- अनिता यादव, माजी नगरसेविका
- रमेश यादव
- गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक
- प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई काॅग्रेस
- सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष
- पुनम कनोजिया
- संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष
- दिलीप साकेरिया - मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष
- हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी
- राजाराम देशमुख, सचिव- मुंबई काॅग्रेस - विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर
- त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई काॅग्रेस कमिटी
- कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष
- ८५ वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश
मुस्लिम समाजाचे मौलाना यांचाही शिंदेगटात
- मौलाना जियाउद्दीन शेख
- मौलाना नौशाद खान
- मौलाना झुबेर खान
- मौलाना झिशान खान
- मौलाना नासिर खान
- मौलाना इरफान खान
- मौलाना रहमान कासिम
कोण आहेत मिलिंद देवरा?
काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील नेते आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. ठाकरेंकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात आल्यानंतर मिलिंद देवरांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली. याच नाराजीतून मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा 15 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य होते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरुद्ध 10 हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत देवरा पुन्हा मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले. मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला.
मिलिंद देवरा यांना सोबत घेतल्यानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फायदा होण्याची चर्चा आहे. सध्या शिंदेंकडे दिल्लीत विशेष चेहरा नाही. मिलिंद देवरांच्या निमित्ताने दिल्लीच्या वर्तुळात आणखी जम बसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना फायदा होणार आहे. याचसाठी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे देवरा यांना सोबत घेण्यासाठी आग्रही होते, अशी माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)