मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचा पक्षाला रामराम
पुढील वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणूकांपुर्वीच आसिफ शेख यांनी व्यक्तीगत कारणास्तव पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत असल्याची घोषणा पत्रकार परिषेद केली. आसिफ शेख यांच्या राजीनाम्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत निश्चित त्याचे पडसाद उमटणार असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना मानणारा मोठा गट पक्षातून बाहेर पडणार आहे.
मनमाड : कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झालेली असतानाच मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आज आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मालेगावमध्ये माजी आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत कॉंग्रेसचा बोलबोला होता. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र आसिफ शेख यांनी सांभळली. मात्र आज अचानक त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा थेट पक्षाध्यक्षांकडे पाठवत, आपण पक्षाचा राजीनाम देत असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यामुळे मालेगाव शहरात कॉंग्रेस पक्षाला खिंडार पडल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सन 2000 साली असिफ शेख यांचे वडील रशिद शेख हे जनता दलाचे मातब्बर नेते स्वर्गिय निहाल अहमद यांना पराजित करत निवडून आले होते. त्यावेळी सगळं निवडणुकीचं सूत्र आसिफ शेख यांनी कमी वयात सांभाळलं होतं. सलग दोन वेळा आमदार रशिद शेख यांनी मालेगाव मतदारसंघाच नेतृत्व केले. त्यानंतर आसिफ शेख यांनी 2002 ते 2012 पर्यंत राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून नागरसेवक पद भुषवलं. 2005 ते 2007 पर्यंत मालेगाव महापालिकेत महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. या काळात त्यांनी अनेक विकासकामं केली. तर 2007 ते 2012 पर्यंत त्यांनी महापालिकेत पक्षाचा गटनेता म्हणून काम केले. तर त्या काळात मालेगाव महानगर क्षेत्राचे ते कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवत चांगली कामगिरी केल्याने पक्षाने त्यांना 2014 साली आमदारकीचे तिकिट दिले आणि त्यात त्यांनी मातब्बरांना हरवत आमदारकीची निवडणूक जिंकली. 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी अनेक विकासाची कामे केली मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव चाखावा लागला.
2017 साली महापालिका निवडणुका पार पडल्या त्यात त्यांचे वडील माजी आमदार रशिद शेख, आई ताहेरा शेख निवडून आल्या. तर कॉंग्रेसला सुद्धा मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळाल्या. मात्र बहुमतासाठी काही जागांची आवश्यकता असताना शिवसेना त्यांच्यासोबत गेली आणि आसिफ शेख यांच्या मातोश्री ताहेरा शेख या महापौर बनल्या. आपल्या कारकिर्दीत आसिफ शेख यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मालेगाव ते मुंबई अशी पदयात्रा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 19 वर्षापासून सतत पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न मालेगाव विधानसभा क्षेत्रात आसिफ शेख यांनी त्यांच्या वडिलांनंतर केला.
मात्र पुढील वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणूकांपुर्वीच आसिफ शेख यांनी व्यक्तीगत कारणास्तव पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत असल्याची घोषणा पत्रकार परिषेद केली. आसिफ शेख यांच्या राजीनाम्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत निश्चित त्याचे पडसाद उमटणार असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना मानणारा मोठा गट पक्षातून बाहेर पडणार आहे. आसिफ शेख यांनी कॉंग्रेसचा राजीनाम दिला असला तरी त्याचे कारण त्यांनी मात्र स्पष्ट केलेले नाही. मात्र कार्यकर्त्यांशी विचार करुन पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यापुढील काळात ते राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सध्या मालेगावच्या राजकीय वर्तुळात जोर धरु लागलीय.
माजी आमदार असलेले आसिफ शेख नेमके कशामुळे नाराज झाले आणि त्यांनी अचानक कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा थेट पक्षाध्यक्षांकडे का दिला. यावर उलट सुलट चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत .त्यामुळे आगामी काळात आसिफ शेख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.