भाजपचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार
भाजपचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. धुळे महापालिका निवडणुकीदरम्यान अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा त्यानंतर राजीनाम दिला होता.
मुंबई : राजकारणात कधी काय घडेल, याचा अंदाज बांधणे कठीण असतं. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली होती. अनेक मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी घरोबा केला. पक्षांतर केलेल्या अनेकांच्या पदरी निराशा आली. मात्र आता वारं फिरलं असल्याचं चित्र तयार झालं आहे. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवारांचा आज 80 वा वाढदिवस आहे आणि आजच अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
धुळे महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने अनिल गोटे नाराज होते. नाराज असणाऱ्या अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा त्यानंतर राजीनामा दिला होता. तेव्हापासून अनिल गोटे भाजपविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. तीच भूमिका त्यांनी धुळ्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कायम ठेवली. मात्र भाजपला धक्का देणे त्यांना शक्य झालं नाही. धुळे महानगरपालिका निवडणुकीत अनिल गोटे यांनी 'लोकसंग्राम' पक्षाची स्थापना केली होती.
त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं अनिल गोटे यांनी जाहीर केलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. अनिल गोटे यांनी धुळे लोकसभा निवडणूक जरुर लढवावी आणि आपलं डिपॉझिट देखील वाचवून दाखवावं, असं आव्हान गिरीश महाजनांनी त्यांना दिलं होतं.
शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यात तेलगी प्रकरणावरुन वाद झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल गोटे यांचा 'तेलगीचा मित्र' म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र हा जुना वाद विसरुन शत्रूचा शत्रू मित्र हे लक्षात घेत अनिल गोटे यांनी आता राष्ट्रवादीची वाट धरली आहे. अनिल गोटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने धुळ्यात भाजपचं काय नुकसान होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.