Forest fire in Nanded : जागतिक वन दिनीच नांदेडमध्ये जंगलाला भीषण आग, औषधी वनस्पतींसह पक्षीही जळून खाक
नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली. किनवट येथील अंबाडी वन क्षेत्राला ही भीषण आग लागली आहे.
Forest fire in Nanded : मराठवाड्यातील सर्वात मोठे जंगलक्षेत्र असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली. किनवट येथील अंबाडी वन क्षेत्राला ही भीषण आग लागली आहे. धुमसणाऱ्या या आगीत अंबाडी जंगलातील वन औषधींसह पक्षीही जळून खाक झाले आहेत. अभयारण्य असणाऱ्या किनवट-माहूर, इस्लापूर जंगल क्षेत्रात गेल्या महिन्याभरात पाच वेळा भीषण आग लागली आहे. तीन ते चार दिवस जंगलात आग धुमसत आहे. मोहफुले, तेंदूपत्ता, लाकडासाठी जंगल पेटवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र म्हणजे जवळपास 67 हजार हेक्टर असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच किनवट येथील अंबाडी वन क्षेत्राला भीषण आग लागली. या जंगल क्षेत्रात वाघ, अस्वल, लांडगा, कोल्हे, नीलगाय, हरीण, काळवीट, बिबट्या असे अनेक वन्यजीव आहेत. तर आयुर्वेदिक वसनस्पती, टेंभी पत्ता, मध, डिंक, लाकूड, मोहफुले हा वन मेवाही मोठ्या प्रमाणात आढळतो. पण या अनेक औषधी वनस्पतींची खान असणाऱ्या अभयारण्यात उन्हाळा सुरु होताच हा वणवा धगधगू लागल्याचे चित्र आहे. किनवट तालुक्यात जवळपास 67 हजार हेक्टर जंगल क्षेत्र असून, वनविभागाकडे 52 हजार तर वनविकास महामंडळाच्या अखत्यारित 15 हजार जंगल क्षेत्र आहे. बऱ्याच जंगलात वनीकरण झाले आहे. दरम्यान, जंगलातील गस्ती पथके फक्त नावालाच असल्याचीही चर्चा होत आहे. अभयारण्यातील पाणवठ्याचेही नियोजन नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
सध्या उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. त्यातच जंगलातील वनवा पेटू लागला आहे. दरम्यान वनविभागाकडून मोठा खर्च करुन प्रतिबंधक रेषा (जाळरेषा) काढूनही, जंगल पेटू लागल्यानं प्रतिबंधक रेषेवर केलेला खर्च वाया गेला आहे. वनवा धगधगत असल्यानं वन्यप्राणी बेसहारा होऊ लागले आहेत. तर विविध पशु, पक्षी, प्राणी, औषधी वनस्पतीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. तसेच जंगलातील झाडे, गवत जळून खाक होत असल्याचे चित्र आहे. तर वनविकास महामंडळाच्या आखत्यारीत असणाऱ्या अंबाडी जंगलात कालपासून वणवा धगधगत असल्याचे चित्र आहे.
जंगलात वणवा लागू नये म्हणून जाळ प्रतिबंधक रेषा मजूर लावून आखली जाते. पण आणखी दोन महिन्यांच्या वर उन्हाळा बाकी असताना, जंगलात वारंवार वणवा पेटून, जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. जंगलाच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. तिनशे हेक्टरच्या आसपास वनक्षेत्र एका वनरक्षकाकडे असायला पाहिजे, पण त्यापेक्षाही अधिक वनक्षेत्र एका वन रक्षकाकडे आहे. त्यामुळं त्याचे संरक्षण करणे कठीण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: