एक्स्प्लोर
चाऱ्यासाठी 'सेल्फी विथ जनावर' द्यावे लागेल : धनंजय मुंडे
अशा दुष्काळात राज्यकारभार कसा करायचा? या परिस्थितीला सामोरे कसे जायचे? हे भाजपा आणि शिवसेनेला उभ्या आयुष्यात माहिती नाही.

बारामती : चाऱ्यासाठी सरकार शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे देणार आहे. पण सरकारचा काही नेम नाही. त्यात 'सेल्फी विथ जनावर' असा निर्णय हे सरकार घेईल, असा घणाघात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे आज बारामती मध्ये दिवाळीनिमित्त पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. म्हणून जनावराच्या दावणीला चारा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. हे सरकार काय निर्णय घेतील सांगता येत नाही. चाऱ्यासाठी ऑनलाईन पैसे देणार म्हणतात, मग आता सेल्फी विथ जनावर आणि जनावरांना चाऱ्यासाठी ऑनलाईन रांगेत उभे करण्याचा निर्णय पण घेतील, असं मुंडे म्हणाले. अशा दुष्काळात राज्यकारभार कसा करायचा? या परिस्थितीला सामोरे कसे जायचे? हे भाजप आणि शिवसेनेला उभ्या आयुष्यात माहिती नाही. अशा या महाभयंकर दुष्काळात हे सरकार जनतेच्या मागे उभे राहत नसल्याचे चित्र दिसत आहे, असं म्हणत राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर मुंडेंनी टीका केली. कर्नाटक पोटनिवडणुकीचे निकाल भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आले आहेत. पूर्वी जसे साठ वर्षे हे सत्तेपासून दूर होते, तसेच आता देशातील व महाराष्ट्रातील जनता यांना पुन्हा सत्तेपासून दूर ठेवेल, असं भाकितही धनंजय मुंडेंनी केले.
आणखी वाचा























