वारंवार पुराचा तडाखा बसणाऱ्या गावांचे स्थलांतर होणे गरजेचे : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत
गेल्या 30 वर्षातील पाऊस आणि पुराचा आधार घेऊन नव्याने एक पुरलाईन तयार करुन त्या दृष्टीने शासनाने हे नवे धोरण ठरविल्यास अशा मोठ्या आपत्तीच्यावेळी कमीतकमी नुकसान होऊन त्यावर मात करणे सोपे होईल, असं त्यांनी सांगितलं.
पंढरपूर : राज्यातील ज्या गावांना वारंवार पुराचा फटका बसतो, अशा नदीकाठच्या गावांना स्थलांतरित करण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागणार आहे. प्रत्येकवेळी या लोकांचं पुरामुळे मोठं नुकसान होतं. याशिवाय सरकारी यंत्रणा आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणात करावे लागत असल्याने हा उपाय आता विचारात घ्यावा लागेल, असे संकेत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले.
पंढरपूर तालुक्यातील पुराचा फटका बसलेल्या शिरढोण या गावातील लोकांना चादरी व इतर मदतीचे वाटप तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सरकारी धोरणे पूर्वीच्या परिस्थितीनुसार बनविण्यात आलेली असून आता परिस्थितीत मोठे बदल होत असल्याने सरकारी धोरणात देखील बदल करणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी सांगितले.
मोठ्या शहरांच्या बाबतीत हे सहज शक्य नसले तरी किमान नदीकाठच्या ग्रामीण भागातील लोकवस्ती गावठाण भागात आता हे गरजेचे होऊ लागल्याचे सावंत यांनी सांगितले. गेल्या 30 वर्षातील पाऊस आणि पुराचा आधार घेऊन नव्याने एक पुरलाईन तयार करुन त्या दृष्टीने शासनाने हे नवे धोरण ठरविल्यास अशा मोठ्या आपत्तीच्यावेळी कमीतकमी नुकसान होऊन त्यावर मात करणे सोपे होईल, असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने सर्वात चांगलं मदतकार्य राबविले असून विरोधक केवळ विरोधासाठी टीका करत असतात, असा टोलाही सावंत यांनी लगावला .