गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानाला मोठं यश, पाच नक्षलवादी ठार
कारवाईनंतर गडचिरोली मुख्यालयात मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य-बंदुका- स्फोटके आणि दैनंदीन साहित्य ताब्यात आल्याची माहिती देण्यात आली. काडतुसे, मॅगझीन, 3 प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल आदीचा समावेश आहे.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील पोलिसांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठं यश आलं आहे. पोलीस कारवाईत पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली.
पोलिसांच्या नक्षलविरोधी C-60 पथकाने 3 दिवसापासून राबवलेल्या अभियानात 5 नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. 3 पुरुष 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक(अभियान) मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवले गेले होते. या कारवाईनंतर गडचिरोली मुख्यालयात मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य-बंदुका- स्फोटके आणि दैनंदीन साहित्य ताब्यात आल्याची माहिती देण्यात आली. काडतुसे, मॅगझीन, 3 प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल आदीचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात गस्त घालण्यासाठी गेलेल्या सी -60 कमांडोच्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. सध्या तेथील गोळीबार थांबला आहे, असं गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी आता शोध मोहीम राबवली जात आहे.
मागील तीन दिवसांपासून छत्तीसगड सीमेवरील कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा भागात नक्षल ऑपरेशन राबवण्यात येत होतं आणि काल 28 तारखेला या भागात मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर काल अतिरिक्त जवानांची तुकडी त्या भागात पाठवण्यात आली आणि आज सकाळी प्लॅनिंग करुन एक मोठी चकमक घडली. यात 5 नक्षली ठार झालेत ज्यात 3 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे या चकमकीच्या जागी मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्यही मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पाचही नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोली पोलिसांच्या हेलिकॉप्टरने गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणले जाणार आहेत. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचं काम करण्यात येणार आहे. गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नक्षल अभियान प्रमुख संदीप पाटील व गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे रुजू झाल्यापासून अनेक मोठ्या नक्षल कारवाई करण्यात आल्या आहेत.
या आधीही 5 मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोरपर्सी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती. सुमारे 12 तास चाललेल्या चकमकीत सी -60 चे काही सैनिकही जखमी झाले. तेथे काही सैनिक अडकलेही होते. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली होती.























