रविवार ठरला घातवार! भीषण अग्नितांडवाची तिसरी घटना, रत्नागिरी एमआयडीसीत आगीचे प्रचंड लोळ
आजचा रविवारचा दिवस हा घातवार ठरला आहे. कारण आज विविध ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.

Fire News : आजचा रविवारचा दिवस हा घातवार ठरला आहे. कारण आज विविध ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. सोलापूरसह रत्नागिरी आणि हैदराबादमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. हैदराबादमध्ये घडलेल्या आगीच्या घटनेत तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एमआयडीसी भागातील टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. आग लागून जवळपास 10 तास उलटले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, आणखी 4 जणांचा शोध सुरु आहे.
हैदराबादमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबादमधील चारमिनारच्या परिसरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी चारमिनार (Charminar) परिसरात असणाऱ्या गुलजार हाऊस इमारतीला आग लागली. ही आग वेगाने पसरत गेली आणि तिने भीषण स्वरुप धारण केले. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, ही आग ( Fire news) शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या रुग्णालयात दुर्घटनेतील आठ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले. आज सकाळी साडेसहा वाजता अग्निशमन दलाला याठिकाणी आग लागल्याची वर्दी मिळाली. यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. सध्या याठिकाणी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या आग विझविण्याचे काम करत आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीतून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींवर चांगल्या पद्धतीने उपचार होतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापुरातील भीषण आगीत 3 जणांचा मृत्यू, 4 जणांचा शोध सुरु
सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याची घटना घडली. रविवारी सकाळी उजाडल्यानंतरही ही आग धुमसतच आहे. त्यामुळे आता ही आग विझवण्यासाठी आजुबाजूच्या अग्निशमन केंद्रांवरील बंब याठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, काल रात्री अग्निशमन दलाने (Fire Birgade) या कारखान्यातून तीन जणांना बाहेर काढले. हे तिघेही आगीने (Solpaur Fire) होरपळल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले होते. या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, कंपनीचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही कंपनीच्या आतच अडकून पडले आहेत. आगीची भीषणता पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता कितपत आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यात असलेले साहित्य अद्याप ही धूमसत असल्याने आत मध्ये जाण्यास अडचण निर्माण होत आहे. भिंत फोडून अग्निशामक दलाच्या जवानांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात धूर असल्याने प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. जवळपास दीड ते दोन तास अग्निशमाक दलाचे जवान आतमध्ये होते. मात्र अडकलेल्या चौघांचा अद्याप शोध लागलेला नाही.
लोटे MIDC मधील लासा कंपनीत भीषण आग
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC मधील लासा कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अपष्ट आहे. मात्र परिसरात धुराचे लोळ पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमाक दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. केमिकल कंपन्यांमध्ये लागणाऱ्या सततच्या आगीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी आहे.
महत्वाच्या बातम्या:























