Maharashtra News: सायबर संरक्षणाबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार; लवकरच राबवण्यात येणार आर्थिक साक्षरता विशेष अभियान
Maharashtra: सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, सुरक्षित गुंतवणूक कशी करावी, याबाबत विशेष अभियान राबवण्यात येणार आहे.
Maharashtra News: सायबर गुन्ह्यांपासून (Cyber Crime) स्वत:चे संरक्षण कसे करावे आणि गुंतवणुकदारांनी गुंतवणूक सुरक्षित (Safe Investment) राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत राज्यात लवकरच विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मनि बी प्रा. लि. यांच्यात मंगळवारी (13 जून) त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आहे. या प्रकारचा आर्थिक साक्षरतेचा करार देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात झाला आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मनि बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दाणी वखरे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवस्थापक अमिश पटेल, श्रीराम कृष्णन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आर्थिक साक्षरतेचा हा करार करण्यात आला आहे.
राज्यातील विद्यापीठे (Universities) आणि महाविद्यालयांच्या (High School) माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षक, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), आणि मनि बी प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यात लवकरच आर्थिक साक्षरता विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असणार आहे.
यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) कधी करायची?, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक (Mutual Fund Investment) कधी करायची?, गुंतवणूक करताना काय खबरदारी घ्यायला हवी? याबाबत मार्गदर्शन विशेष अभियानातून करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक गुंतवणुकीची कशी खबरदारी घ्यावी? आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे? याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डिजिटल सिस्टीम सुरक्षितता (Digital System Security) आणि सायबर हल्ले (Cyber Attack) रोखण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षीत आणि प्रशिक्षीत करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.
सायबर अटॅक म्हणजे नक्की काय?
सोप्या भाषेत सायबर अटॅक म्हणजे काय हे सांगायचं झालं तर हा एक असा हल्ला आहे, जो इंटरनेटवर आणि इंटरनेटशी संबंधित गोष्टींवर केला जातो आणि जर कोणी या हल्ल्याच्या विळख्यात आला तर वापरकर्त्याचा मोबाईल किंवा कॉम्प्युटर हॅक होणे, वैयक्तिक डेटाची चोरी होणे, वापरकर्त्याची ऑनलाइन फसवणूक होणे अशा गोष्टी घडतात.
हेही वाचा:
GPay, PhonePe किंवा Paytm वापरत असाल तर हे काम आताच करा, प्रायव्हसी होईल आणखी सुरक्षित!