(Source: ECI/ABP News/ABP Majha)
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो
औरंगाबादमध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक ही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची महाराष्ट्राला ओळख आहे.
औरंगाबाद : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. उस्मानाबादेत हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
औरंगाबादमध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक ही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची महाराष्ट्राला ओळख आहे. गेल्यावर्षी त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या साहित्यिक-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले आहे.
फ्रान्सिस दिब्रिटो 1983 ते 2007 या कालावधीत कालखंडात 'सुवार्ता' या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. 'सुवार्ता' या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्ती धर्मियांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला.
फ्रान्सिस दिब्रिटो हे पुणे येथे झालेल्या 15 व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'सुबोध बायबल- नवा करार' या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा 2013 सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.