(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवाळी, पेरणी की देणेदारी.. सोयाबीन दरात घसरण झाल्याने सणासुदीच्या तोंडावर शेतकरी चिंतेत
सोयाबीन दरात घसरण झाल्याने सणासुदीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिवाळी, पेरणी की देणेदारी द्यावी, अशा विवंचनेत तो सापडला आहे.
लातूर : दसऱ्यानंतर शेतमालाची बाजारपेठेत आवक सुरू होते. दिवाळीत बाजारपेठेत प्रचंड जोश असतो. मात्र, यावर्षी सोयाबीनच्या दरात सतत होणाऱ्या घसरणीमुळे आवक मंदावली आहे. दिवाळीचा खर्च असेल किंवा पुढील पेरणीचा खर्च या विवंचनेत आता बळीराजा आहे.
देशात सोयाबीन उत्पादन करण्यात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य आहे. राज्यातील जवळपास 28 जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. मराठवाड्यात लातूर सारख्या जिल्ह्यात सोयाबीनचा विक्रमी पेरा होत असतो. यावर्षी पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातच मागील काही दिवसात सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. गत हंगामाच्या शेवटाला सोयाबीनचे दर हे 11 हजाराच्या घरात गेले होते. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सोयाबीनची आवक सुरू झाली आणि भावात घसरण सुरू झाली. अवघ्या काही दिवसात 10 हजारी पार झालेले सोयाबीन 7 हजारांवर आला होता. सोयाबीनची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि भावात घसरण वाढत गेली. आज भाव 4800 ते 5200 च्या घरात आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी हातात नकदी पैसे पडतील अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्याला ह्या घसरणीचा फटका बसला आहे.
लातूर बाजारात मराठवाडा, तेलंगाणा आणि कर्नाटकच्या भागातूनही शेतमाल येत असतो. येथील बाजारात कायमच चढा भाव आणि शेतमालाचा काटा झाला की तात्काळ पैसे देण्याची प्रथा आहे. यामुळे कर्नाटकातील शेतकरी अमृतराव येथे आले. मात्र, गुलबर्गा येथील भाव आणि लातूरच्या भावात एव्हढा फरक नसल्यामुळे त्याच्या हाती निराशा आली आहे. जी अवस्था लातूरच्या बाजारपेठेची तीच अवस्था उस्मानाबाद येथील बाजारपेठेत आहे. शेतकरी सोयाबीन घेऊन आला खरा मात्र भावातील घसरणीमुळे त्याच्या पदरी निराशा पडली आहे.
येत्या काळात भावाबाबत काहीच सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे. जागतिक बाजारात सोयाबीनचे भावाचा परिणाम देशात होतोय. हे चित्र दिवाळीनंतर स्पष्ट होईल तोपर्यंत आवश्यकता असेल एवढाच माल शेतकऱ्यांनी विकावा, असे मत व्यापारी बाळाप्रसाद बिदादा यांनी व्यक्त केले आहे. मागील चार दिवसात 5200 असलेला भाव 4800 पर्यंत खाली आला आहे. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे आवकवर परिणाम झाला आहे. बाजाराचा अंदाज घेऊन शेतकरी बाजारात येत आहे. ज्यांच्याकडे माल विकल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असेच शेतकरी बाजारात येत आहेत. पेरणी, देणी आणि दिवाळीचा खर्च अशा चक्रात अडकलेला शेतकरी येईल तो भाव आपला अशा विचारत येत आहे. मात्र, भावातील घसरणीमुळे आज आवक मंदावली आहे, असे मत आडत व्यापारी माणिक मोरे यांनी व्यक्त केले आहे.
सततच्या नैसर्गिक आपत्तीचा सामान करत बळीराजा पार जेरीला आला आहे. त्यातच आता हे भाव पडल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याची वेळ आली आहे. दिवाळी गोड करण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारी याकडे लक्ष देतील का? हा खरा प्रश्न आहे.
सोयाबीनच्या दरातील घसरण
सोयाबीन दर
23 ऑगस्ट 10800
4 सप्टेंबर 9500
6 सप्टेंबर 8700
1 ऑक्टोबर 6300
या नंतर प्रतिदिन 100 रुपये घसरण झाली
8 ऑक्टोबर 6100
15 ऑक्टोबर 5300
20 ऑक्टोबर 5400
25 ऑक्टोबर 5200
26 ऑक्टोबर 5000
फडीवर तर 4200 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केले जात आहे.