(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmers suicide : परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर, विदर्भात 3 दिवसात 3 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसा झालं आहे. पिकांचं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या 3 दिवसात विदर्भातील 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers suicide) केल्या आहेत.
Farmers suicide News : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची हाती आलेला घास या पावसानं हिरावून घेतला आहे. या नुकासनीमुळं सध्या शेतकरी तणावात आहेत. त्यामुळं काही ठिकाणी शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत. पिकांचं होणारं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या 3 दिवसात विदर्भातील 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers suicide) केल्या आहेत.
यावर्षी राज्यात पिकांसाठी सरुवातीला समाधानकार पाऊस पडला होता. पीक परिस्थितीही समाधानकारक असताना एन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक परतीच्या पावसानं हिरावून घेतलं आहे. त्यामुळं आता शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धननगरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील गोवर्धननगर येथील शेतकरी संदीप चव्हाण यांनी आपल्या तीन एकर शेतात सोयाबीन पेरलं होतं. सोयाबीनचे पिकाचे पैसे आल्यावर जवळच्या लोकांचं घेतलेलं कर्ज ते परत करणार होते. त्याचं नियोजनही त्यांनी केलं होतं. पण परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं झालं. दिवसभर शेतात सोयाबीन कापून जमा केलं. सायंकाळी सोयाबीन बघितलं आणि अपेक्षित उत्पन्न येणार नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर रात्री शेतातून घरी न जाता शेतातच झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं.
अतिवृष्टीमुळं सोयाबीनचं नुकसान, यवतमाळमध्ये शेतकऱ्यानं संपवलं जीवन
यवतमाळ जिल्ह्यातील माळेगाव येथील शेतकरी प्रेम पवार यांनी ही दुबार-तिबार पेरणीमुळं आर्थिक संकटात सापडल्यानं यावरही परतीच्या पावसानं शेतातील सोयाबीनचं पिकं उध्वस्त झालं आहे. त्यामुळं शेतकरी आता कर्ज कसं फेडणार ? या विवंचणेतून त्यांनी आपल्या घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घरातील कर्त्याने असं जीवन संपवल्यानं संपूर्ण घरावर मोठं संकट कोसळलं आहे. प्रेम यांच्या पश्चात वृद्ध आईवडील पत्नी आणि चार मुलं आहेत.
भंडारा जिल्ह्यातील वृद्ध शेतकऱ्यानं संपवलं जीवन
विदर्भातील भंडारा जिल्ह्यालाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. भंडाऱ्यातील हाता-तोंडाशी आलेलं धानाचं पीक या पावसानं उध्वस्त झालं आहे. जिल्ह्यातील लाखनी केसळवाडा येथील वृद्ध शेतकरी संताराम ढवळे यांच्या शेतातील धानाचं संपूर्ण पीक परतीच्या पावसानं उध्वस्त झाल्यानं आता पुढील वर्षभर आर्थिक गणित जुळवण्याच्या विवंचणेतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जीवनाच्या या टप्प्यात अशा वृद्ध शेतकऱ्यांनाही निसर्गाच्या या अपत्तीने सोडलं नसल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाचं संकट होतं. त्या तणावातून शेतकरी जात असताना या वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला. पिकाची स्थितीही चांगली होती. मात्र, परतीच्या पावसानं घात केला. शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळं आता शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. यातून शेतकरी टोकाचं पाऊस उचलत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: