Sadabhau Khot on CM : रोमच्या राजाप्रमाणं मुख्यमंत्री बिगुल वाजवत बसलेत, खोतांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा, तर शेट्टींनाही टोला
अतिरिक्त उसाच्या प्रश्नावरुन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच राजू शेट्टींना देखील टोला लगावला आहे.
Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray : राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकरी उसाचे फड जाळून आत्महत्या करत आहेत. अशात मुख्यमंत्री रोम जळत असताना तिथला राजा जसा बिगुल वाजवत होता तसा बिगुल वाजवत असल्याचे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नसल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी परभणीत केली. तसेच राजू शेट्टींनी चळवळ ही राजकारणाच्या चक्रावर ठेवल्याचा टोला देखील खोतांनी शेट्टींना लगावला.
दरम्यान, रयत क्रांती संघटेनच्यावतीने सदाभाऊ खोत हे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियाना अंतर्गत राज्यभर फिरत आहेत. आज त्यांनी परभणीच्या मानवत तालुक्यातील रुढी इथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी राज्यातील अतिरिक्त उसाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली. रोमच्या राजाचे उदाहरण देत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तसेच राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने काय दिले? या प्रश्नावर त्यांनी राजू शेट्टींनी चळवळ ही राजकारणाच्या चक्रावर ठेवली. ज्यामध्ये ते जिंकले की नाही याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे असा टोला देखील खोतांनी शेट्टींनी लगावला. येत्या 20 मे ला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात लाखो शेतकऱ्यांची सभा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना खरा आक्रोश दिसेल असं सूचक वक्तव्यही सदाभाऊ खोत यांनी केलं.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून, आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. ऊस जात नसल्याने बीड जिल्ह्यातील एका 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने उसाच्या फडाला आग लावून त्याच फडातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नामदेव जाधव असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेवरुन सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला.
सदाभाऊ खोत यांनी शेतकरी, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, कामगार, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी 29 एप्रिलपासून सिंधुदुर्गातुन केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून खोत हे शेतकऱ्यांचे तरुणांचे, बेरोजगारांचे प्रश्न समजून घेत आहेत. तसेच या प्रशानवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या: