Farmer Success Story : नोकरी सोडून शेती केली, घरच्यांचा विरोध पत्करला, दूध नाही तर तुपाचा व्यावसाय सुरु केला; महिन्याला कमावतो लाखो रुपये
आत्मविश्वास, कल्पकता आणि संयम याच्या जोरावर माणूस काहीही करु शकतो, हे फलटण तालुक्यातील आसू येथील शेतकरी सचिन ताम्हाणे यांनी सिद्ध केलं आहे. सचिन यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.
Farmer Success story : आत्मविश्वास, कल्पकता आणि संयम याच्या जोरावर माणूस काहीही करु शकतो, हे फलटण तालुक्यातील आसू येथील शेतकरी सचिन ताम्हाणे यांनी सिद्ध केलं आहे. सचिन यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याचा जोडधंदा म्हणून गायीचं दूध न विकता त्यापासून तयार केलेल्या तुपाचा व्यावसाय सचिन यांनी सुरु केला. या व्यवसायातून सचिन 3 हजार 350 रुपये प्रतिकिलोने, महिन्याला 60 ते 85 लिटर तूप विकतात. त्यांच्या या तुपाला जगभरातून मागणी आहे.
फलटण तालुक्यातील आसू येथील शेतकरी सचिन ताम्हणे उच्चशिक्षित असून देखील नोकरी सोडून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. 2016 साली सचिन ताम्हाणे यांनी पंजाबमधून साहीवाल जातीच्या आठ गाई आणल्या होत्या. आता त्यांच्याकडे लहान मोठ्या अशा 40 गाई आहेत. गाईच्या दुधापासून ते तूप काढतात. त्याची 3350 रुपये प्रति लिटरने विक्री भारतात तसेच भारताबाहेर देखील करतात.
विविध कामांसाठी बैलाचा उपयोग...
गोठ्यात असेलले बैल शेती कामाच्या उपयोगी येत नाहीत, म्हणून बैलावर चालणारा ताम्हाणे यांनी लाकडी तेलाचा घाणा सुरू केला आहे. दिवसात 40 ते 45 किलो शेंगदाणा गाळप करतात त्यातून ते 15 किलो तेल काढतात. त्या तेलाची विक्री 440 रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री ताम्हाणे करतात. तसेच शेण आणि गाईच्या गोमूत्रपासून ते विविध बाय प्रॉडक्ट बनवतात. त्यामध्ये साबण, धूप, फेसपॅक, अर्क, दंतमंजन असे प्रॉडक्ट बनवतात ज्याला बाजारात चांगली मागणी आहे.
ताम्हाणे यांचा दिनक्रम कसा आहे?
ताम्हाणे यांचा दिवस पहाटे सुरू होतो. पहाटे पाच आणि संध्याकाळी पाच वाजता दूध काढलं जातं. त्यानंतर काढलेले दूध हे मोठ्या लोखंडी कढईत गरम करतात, त्यानंतर त्याचे दही लावून दुसऱ्या दिवशी पहाटे लाकडी रवीने दही घुसळतात. त्यानंतर लोणी काढून सूर्योदयापूर्वी चुलीवर गोवऱ्या जाळून तूप काढतात. त्यामध्ये खाऊचे पान, तुळशीची पाने, लवंग सारखे पदार्थ टाकून उच्च प्रतीचे तूप काढतात.
शेती करण्यासाठी घरच्यांचा विरोध...
सचिन ताम्हाणे यांना त्यांच्या घरच्यांनी शेती करण्यास विरोध केला होता. परंतु घरच्यांचा विरोध स्वीकारून सचिन यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला. आज त्यांचा निर्णय योग्य होता असे त्यांचे वडील सांगतात.
'नोकरीत रमू नका, व्यावसाय करा'
सुरुवातील जगन्नाथ ताम्हाणे हे रासायनिक शेती करायचे. त्यामुळे त्यांना शेती परवडत नव्हती. परंतु जेव्हापासून सचिन शेती करू लागले तेव्हापासून त्यांना शेतातून चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे गाईच्या दुधापासून महिन्याला 60 ते 85 लिटर तूप, लाकडी घाण्यापासून तेल, तसेच शेण आणि गोमूत्रापासून तयार केलेल्या बाय प्रॉडक्टमधून त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. दर महिन्याला यातून चांगले पैसे कमवत तर आहेतच, परंतु चांगले आणि देशी अन्न खाल्याने त्यांचे आरोग्य देखील निरोगी राहते आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शहरात नोकरीत न रमता गावाकडे व्यवसाय करावा, असे सचिन ताम्हाणे युवकांना सांगतात.