शेतकऱ्याच्या मुलीची गगनभरारी! घरीच अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात UPSC च्या परिक्षेत यश
बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या (UPSC) परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे घरीच अभ्यास करत तिने हे यश मिळवले आहे. श्रद्धा शिंदे असे तिचे नाव आहे.
बीड : एका शेतकऱ्याच्या मुलीने जिद्दीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी (UPSC) च्या परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे. घरीच अभ्यास करत तिने हे यश मिळवले आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे असे त्या मुलीचे नाव आहे. यूपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ती राज्यात पहिली तर देशात 36 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. श्रद्धाचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील असून ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी असून त्या अशिक्षित आहेत. श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडलाच झाले.
श्रद्धा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडला झाल्यानंतर तिने औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण केले. 2018 ला श्रद्धाने अभियांत्रिकीची पदवी हाती घेतली. त्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली व सहा महिने शिकवणी केली. त्यानंतर 2019 च्या अखेरीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES)परीक्षेसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. श्रद्धा शिंदेने परीक्षेचा फॉर्म भरला आणि जानेवारी 2020 प्रिलिमनरी परीक्षाही दिली. पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच परीक्षेत तिला यशही मिळाले. त्यानंतर तिने घरी राहूनच मुख्य परीक्षेचीही तयारी केली. ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला. यातही तिला यश मिळाले. त्यानंतर मार्च 2021 मध्ये तिची मुलाखत झाली. या सर्व परीक्षेचा एकत्रित निकाल रविवारी पजाहीर झाला. यामध्ये श्रद्धाने देशात 36 वा क्रमांक मिळविला आहे. युपीएससीतून आयएएस, आयआरएस, आयपीएस सेवेत जाणाऱ्यांची जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र, मुलींमधून भारतीय अभियांत्रिकी सेवेत जाणारी श्रद्धा जिल्ह्यातील पहिलीच आहे.
2018 ला इलेक्ट्रीकल इंजिनीअर ही पदवी हातात घेताच तिने शिक्षण घेतलेल्या औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिला सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर नोकरीची ऑफर केली. मात्र, तिला भारतीय अभियांत्रिकी सेवेत जायचे होते. त्यामुळे तिने नकार देत युपीएससीची तयारी केली. श्रद्धाच्या यशाविषयी वडील नवनाथ शिंदे म्हणाले, की मी सर्वसामान्य शेतकरी आहे. लहानपणापासून श्रद्धाची शिकायची मोठी जिद्द होती. तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केलं असून तिने या परिक्षेमध्ये मोठे यश मिळवले आहे. श्रद्धालामी मुलाप्रमाणेच सांभाळले असल्याचे नवनाथ शिंदे यांनी सांगितले. मुलापेक्षा जास्त मी तिला समजत आहे. त्यामुळे खरंच असा भेदभाव करायची गरज नाही. लोक म्हणतात मुलगी आहे, 18- 20 वर्ष झाले की लग्न करायचं, नको शिकवायचं. मात्र, मी तसं केलं नाही. त्यामुळं आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: