एक्स्प्लोर
शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्या 9 प्रतिष्ठानांवर ईडीचे छापे
शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर 328 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या परभणी, नागपूर आणि मुंबईतील घर आणि प्रतिष्ठानांवर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) काल (गुरुवारी) छापे मारले आहेत.
परभणी : शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर 328 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या परभणी, नागपूर आणि मुंबईतील घर आणि प्रतिष्ठानांवर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) काल (गुरुवारी) छापे मारले आहेत. हे छापे मारुन महत्त्वाची कागतपत्रं जप्त केली आहेत. औरंगाबाद उच्च न्यायालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत गुट्टे यांची मालमत्ता अद्याप का जप्त करण्यात आली नाही? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला. त्यानंतर ताबडतोब ही कारवाई करण्यात आली आहे.
रत्नाकर गुट्टे यांना अटक झाल्यानंतर त्यांनी गंगाखेड न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. त्यामुळे गुट्टे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु औरंगाबाद न्यायालनेदेखील गुट्टे यांचा जामीन अर्ज फेटाळला, तसेच न्यायालयाने तपासणी पथकाला चांगलेच खडसावले. न्यायालयाने गुट्टेंच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित केला.
मालमत्ता जप्तीचे आदेश देऊनही तुम्ही त्यांची मालमत्ता जप्त का केली नाही? असा सवाल तपासणी पथकासमोर उपस्थित केला. त्यानंतर काल अत्यंत गुप्तपणे ईडीच्या 25 अधिकाऱ्यांनी गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्स लिमिटेड या कारखान्यासह परळी येथील घर, मुंबई आणि नागपूर येथील कार्यालयांसह अशा 9 ठिकाणी छापे मारून अनेक महत्वाची कागतपत्र आणि दस्तावेज जप्त केले आहेत.
व्हिडीओ पाहा
काय आहे प्रकरण
2017 मध्ये परभणीच्या गंगाखेड शुगर्स अँन्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने 29 हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर 6 बँकाकडून तब्बल 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगन्मत करुन ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले आहेत, ऊस पुरवला आहे अशा परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि जालन्यासह राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागतपत्र तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि मुंबईच्या रत्नाकर बँकेकडून तब्बल 328 कोटी रुपयांचे कर्ज परस्पर उचलले.
या कर्जाबाबत शेतकऱ्यांना बँकांनी नोटीसा पाठवल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. त्यामुळे रत्नाकर गुट्टे यांच्यावर 5 जुलै 2017 रोजी भादंवि कलम 406,409,417,420 आणि 467,468,471,120-ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
दोन वर्षांनंतर याप्रकरणी कारवाईला सुरुवात झाली. 28 फेब्रुवारीला गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 27 मार्च रोजी औरंगाबाद सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड आणि डीवायएसपी पठाण यांचे पथक गंगाखेडमध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांना अटक करून गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीश एस. जी. दुबाले यांच्यासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाचे दोषरोप पत्रही दाखल केले. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जी आजपर्यंत कायम आहे.
कोण आहेत रत्नाकर गुट्टे?
रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी. परळीच्या थर्मल प्लाँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत.
रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुट्टे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या.
सध्या रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जात असले तरी गुट्टे सध्या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आहेत. मागची विधानसभा गुट्टेनी जानकरांच्या पक्षातर्फे लढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement