Famous Ganpati Temple in Pune : प्राचीन, ऐतिहासिक पुण्यातील पाच प्रसिद्ध गणपती मंदिरं, कुठे जिजाऊंनी जीर्णोद्धार केला तर कुठे पुणेकरांच्या पाण्याची सोय करण्यात आली...
पुण्यातील पाच प्राचीन आणि ऐतिहासिक गणपती मंदिरं कोणती? आणि त्या मंदिराता इतिहास जाणून घेऊयात....
पुणे : पुण्यातील गणेशोत्सवाचा नावलौकिक जगभर आहे. पुण्याला प्राचीन आणि ऐतिहासिक नगरी म्हटलं जातं. त्यामुळे पुण्यात शिवकालीन आणि पेशवेकालीन अनेक दस्तावेज सापडतात. त्यात महत्वाचं म्हणजे प्राचीन गणपती मंदिरं. पुण्यात अनेक शिवकालीन, पेशवेकालीन प्रचीन मंदिरं आहेत. या प्रत्येक मंदिरांची वैशिष्ट्ये आहेत. त्याची वेगळी अख्यायिका आणि इतिहासही आहे. पुण्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन गणपती मंदिरं कोणती पाहूया...
कसबा गणपती मंदिर
कसबा गणपतीला पुण्याचं ग्रामदैवत का म्हटलं जातं? यामागे मोठा इतिहास आहे. जिजाऊंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुणे शहर पुन्हा बसवण्यासाठी जिजाऊ माँ साहेबांनी पुण्यावरती सोन्याचा नांगर फिरवला होता. त्याचवेळी त्यांनी कसबा गणपतीचा देखील जीर्णोद्धार केला. दादोजी कोंडदेवांनी पुण्यात गणपतीची मूर्ती सापडल्याची बातमी दिल्यानंतर जिजाऊंनी मंदिराची स्थापना केली. पुण्यातील प्रमुख मूर्ती म्हणून मूर्तींचा दर्जा बाळ गंगाधर टिळकांनी ठरवला होता. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर
पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणून ओळखता जातो. पुण्यात येणारा प्रत्येक नागरिक, नेते किंवा कलाकार श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतात. या मंदिरामागे मोठी कहाणी आहे. अठराव्या शतकात पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई नावाचे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. दगडूशेठ गणपती ज्या परिसरात आहे. त्याच परिसराजवळ असलेल्या बुधवार पेठेत ते राहत होते. त्याच काळात प्लेगची साथ पसरली होती अनेक लोक या प्लेगच्या साथीमुळे मृत्यूमुखी पडत होते. यातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नीवर या घटनेचा मोठा परिणाम झाला. माधवनाथ नावाच्या महाराजांनी या दोघांना दत्ताची मूर्ती आणि गणपतीच्या मूर्तीची पूजा, उपासना करायला सांगितली. दोघांनी मूर्ती तयार केली आणि या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यानंतर 1896 मध्ये दुसरी मूर्ती तयार करण्यात आली होती. जेव्हा या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली. त्यानंतर 1968 मध्ये सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून आधीच्या मूर्तीसारखी एक नवीन मूर्ती बनवली होती.
सारसबाग गणपती मंदिर
पुण्यात सारसबाग गणपती मंदिर हे रचनेमुळे प्रसिद्ध आहे. या गणपतीला तळ्यातला गणपती असंही म्हटलं जातं. हे मंदिर पाहण्यासाठी राज्यभरतातून भाविक दर्शनासाठी येत असतात. पुणे शहराच्या रचनेत महत्त्वाचं स्थान असणारं सारसबागेतलं तळं 1750 मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी खोदलं होतं. पुणेकरांना कात्रजच्या तलावातून पाणी मिळावं, यासाठी व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यानंतर सवाई माधवराव पेशवे यांनी 1784 मध्ये तळ्यात गणपतीचं मंदिर बांधलं. त्यावेळी या मंदिरात नावेतून जावं लागत होतं. मात्र शहर बदललं तशी मंदिरांची रचनादेखील बदलण्यात आली.
त्रिशुंड्या गणपती
पुण्यात अनेक प्रचीन मंदिरांपैकी एक असलेलं हे त्रिशुंड्या गणपती मंदिर आहे. या गणपतीची मूर्ती सगळ्यात वेगळी आणि देखणी आहे. गणपतीला तीन सोंड असून मयुरावर त्रिशुंड गणपती बसलेला आहे. या मंदिराची शिल्पकला पाहण्यासारखी आहे. पुण्यातील सोमवार पेठेत हे मंदिर असून अनेक इतिहास अभ्यासक या मंदिराला आवर्जून भेट देतात.
दशभुजा गणपती
पुण्याच्या कोथरुड भागातील हे गणेश मंदिर आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा आणि दहा हात असलेला आहे. यामुळे या गणपतीला दशभूजा गणपती असे म्हणतात. हरिपंत फडके यांनी हे मंदिर बांधलं होतं आणि दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यात दिलं होतं. हा गणपती नवसाला पावतो, अशी या गणपतीची ओळख आहे.