(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु: कुलगुरुंच्या अहवालानंतर अंतिम निर्णय
अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया 31ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
मुंबई : अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल, कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग संचालक यांचेकडून शासन परिपत्रक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. परीक्षा 50 मार्कांची तर वेळ एक तासाची असणार आहे. अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया 31ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु आहे. ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस या तीन पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. या तीन पर्यायांपैकी प्रत्येक विद्यापीठ एक पर्याय निवडणार आहे. प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार आहे. काल राज्यपालांशी चर्चा झाल्यानंतर आज कुलगुरूंची समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. अकादमी कौन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर परीक्षा आयोगाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवावा लागेल.
कशी असेल परीक्षा?- परीक्षेत 60 प्रश्न असतील. त्यातील 50 सोडवणे आवश्यक.
- प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा. तासाठी एक तासाची वेळ.
- 50 मार्क इंटर्नल, 50 मार्क एक्सटर्नल.
- 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर इटर्नल परीक्षा. तर 1ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर सर्व विषयाची ऑनलाईन परीक्षा आणि निकाल.
- 1 नोव्हेंबरला नवे अॅडमिशन सुरू होतील.
- 10 नोव्हेंबरला ऑनलाईन शिकवणी सुरू होईल.
- मोबाईल आणि कॉम्प्युटर असलेले 90 टक्के विद्यार्थी आहेत.
- ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत त्यांना MKCL मार्फत परीक्षा देता येणार.
- कोविड किंवा अपघात जखमी असेल तर MKCL त्यांची परीक्षा घेण्याची व्यवस्था करेल.
- कोरोनाच्या पार्शवभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवून परीक्षा पद्धतीचा अवलंब करणे.
- विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा पोहचू नये यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
- परीक्षा पद्धत ठरवण्यासाठी कुलगुरूंना विद्यापीठ प्राधिकरण व व्यवस्थापन परिषद यांच्याशी बैठक घेऊन 7 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेणे.
- 15 सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक व 1 ते 31 ऑक्टोबर परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे.
- विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अभ्यासक्रम वेळापत्रक लवकर अवगत करणे.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक घेऊन परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव युजीसीला पाठवणे.