Rajya Sabha Election | राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक
राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे, त्यासाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे.
मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे.
येत्या 6 मार्चला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. 13 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर 26 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान मतदान पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
Election Commission of India: Biennial elections to theCouncil of States tofill the seats of 55 members of Rajya Sabha from 17 states, retiring in April 2020, will be held on 26th March. pic.twitter.com/11q8gPTtip
— ANI (@ANI) February 25, 2020
यंदा जे सात सदस्य निवृत्त होत आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार, रामदास आठवले यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार यात शंका नाही. मात्र उरलेल्यांपैकी कोणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला नव्याने संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, विजया रहाटकर, हंसराज अहिर असे दावेदार आहेत. तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना यावेळी राज्यसभेवर संधी मिळणार का याचीही उत्सुकता आहे.
उदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय? राज्यसभेच्या उमेदवारीवरुन संजय काकडेंचा सवाल
राष्ट्रवादीकडून शरद पवार, भाजपकडून रामदास आठवले परत राज्यसभेवर येणार यात शंका नाही. महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर 7 पैकी 4 खासदार त्यांचे निवडून येऊ शकतात. त्यामुळे यात राष्ट्रवादीला दोन खासदार, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक अशी विभागणी होऊ शकते. शिवसेनेच्या मदतीची भरपाई पुढच्या वेळी त्यांना अधिक सीट देऊन केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.
राज्यसभेसाठी सर्वात जास्त स्पर्धा भाजपमध्ये आहे. साताऱ्यातून लोकसभा निवडणूक हारलेले उदयनराजे भोसले, शिवसेनेमुळे तिकीट नाकारलेले किरीट सोमय्या, मागच्या वेळी ज्यांना राज्यसभा अर्ज माघारी घ्यावा लागला त्या विजया रहाटकर याशिवाय माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर असे अनेक दावेदार भाजपकडून आहेत. मात्र यापैकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.
काँग्रेसकडून हुसैन दलवाई यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी सुशीलकुमार शिंदे यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना संधी मिळणार का याचीही उत्सुकता असेल. महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार राज्यसभेवर जातात. दर दोन वर्षांनी 7, 6 आणि 6 अशा जागा रिक्त होतात. सहा वर्षांपूर्वी जेव्हा 7 जागांसाठी निवड झाली होती तेव्हा ती बिनविरोध झाली होती. आता याहीवेळी ही निवडणूक बिनविरोध होणार की एखादा जास्तीचा उमेदवार रिंगणात येऊन घोडेबाजाराला ऊत येणार हे देखील पाहावं लागेल.
उदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय? खा. संजय काकडेंचा सवाल | ABP Majha