Fact Check : रिक्षासोबत उभे असलेले हे व्यक्ती एकनाथ शिंदे नाहीत; मग ते कोण?
Eknath Shinde Viral Photo : 1997चा हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) असल्याची सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चा रंगली आहे.
Eknath Shinde : सजवलेली रिक्षा आणि त्यासमोर दाढी वाढवलेली एक व्यक्ती. 1997चा हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) असल्याची सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चा रंगली आहे. प्रत्यक्षात हा फोटो पिंपरी चिंचवडमधील महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळेंचा (Baba Kamble) आहे. बाबांच्या समर्थकांनीच हा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केला. रिक्षावाले मुख्यमंत्री झाले म्हणून पिंपरी चिंचवडमधील काही रिक्षा चालकांनी त्यांचे नेते म्हणून बाबांचा हा फोटो पुढं आणला. काहींना रिक्षावाल्यांना अच्छे दिन आल्याचं यातून म्हणायचं होतं. पण काहींना मात्र हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच आहे, अशी चर्चा घडवायची होती. ही चर्चा घडविण्यात त्यांना यश ही आल्याचं दिसत आहे.
चहावाले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले अन चहा विक्रेते चर्चेच्या केंद्रस्थानी आले. आता रिक्षावाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच, रिक्षावाले नेते सर्वत्र मिरवू लागले. अशातच रिक्षावाले नेत्यांनी त्यांचे फोटो समर्थकांद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केले. योगायोग म्हणजे पिंपरी चिंचवडमधील रिक्षाचालकांचे नेते बाबा कांबळे पूर्वी दाढीत मिरवायचे. सजवलेल्या रिक्षा समोर 1997 साली बाबांनी दाढीत काढलेला फोटो समोर आला.
मुख्यमंत्री आणि बाबांच्या चेहऱ्यातला साधर्म म्हणजे 'दाढी'. म्हणूनच हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच आहे, अशी मिश्किल चर्चा काही समर्थकांनी घडवली. यातून प्रसिद्धी मिळेल असा शुद्ध हेतू ही काहींचा होता, त्यात पुढं जाऊन यश ही आलं. पण रिक्षाचा नंबर एमएच 14 ने सुरू होत असल्याने, काही हुशार मंडळींना हा फोटो पिंपरी चिंचवडमधील असल्याचं लक्षात आलं. असं असलं तरी सध्या हा फोटो फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.
एकेकाळी रिक्षाचालक असणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. ही बाब राज्यातील रिक्षा चालकांसाठी अभिमानाची आहे. अशातच काही रिक्षा चालकांनी माझ्या कार्यालयातील माझा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. पुढं जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा जुना फोटो असल्याची त्याला जोड मिळाली. नंतर मात्र हा फोटो माझा असल्याचं समोर आल्यावर मला राज्यातून अनेकांचे फोन आले. मुख्यमंत्री आणि मला ही दाढी असल्यानं तशी चर्चा घडली, अशी प्रतिक्रिया बाबा कांबळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
इतर काही महत्वाच्या बातम्या