Eknath Shinde Assam : ''बंडवीर'' एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने शिवसेनेला 8 जिल्ह्यात भगदाड, 3 बालेकिल्ले ओस पडले!
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने राज्यातील 8 जिल्ह्यामध्ये शिवसेनेला फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये 5 मंत्री सुद्धा आहेत. शिवसेनेच्या तीन बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसला आहे.
Eknath Shinde : शिवसेनेच्या स्थापनेपासून फुटीचे ग्रहण नवीन नसले, तरी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीने तगडे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास सरकारचा डोलारा सांभाळत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. भाजपने पुरवलेल्या रसदीच्या जोरावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमधील हाॅटेल रॅडिसनमध्ये तंबू ठोकला आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी याच हाॅटेलमधून एबीपी माझाशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33, तर 3 अपक्ष आमदार असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने राज्यातील 8 जिल्ह्यामध्ये शिवसेनेला फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये 5 मंत्री सुद्धा आहेत. शिवसेनेचा जो बालेकिल्ला मानला जातो त्या ठाणे आणि औरंगाबादमध्ये शिवसेना या बंडाळीने पूर्ण रिकामी झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यानंतर 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आणखी 10 आमदार सोबत येतील, असाही दावा केला आहे. त्यामुळे ते नेमके कोण ? याची चर्चा सुरु झाली आहे. अजून 3 आमदार शिंदे यांना पाठिंबा देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
औरंगाबाद, कोकण आणि ठाणे हा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, याच 3 बालेकिल्ल्यातील सर्वाधिक शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबर धक्का मानला जात आहे. मात्र, शिवसेनेच्या जोरावर मोठे होऊन यांना आणखी काय कमी पडले? असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडला आहे. बंडखोर आमदार नेतृत्वावर नाराजी नसल्याचे सांगत आहेत, मग एवढा मोठा निर्णय का घेतला असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कोकणातील 9 आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला
बंडखोरी केलेल्या आमदारांमध्ये कोकणमधील 9 आमदारांचा समावेश आहे. पालघर 1, ठाणे 5 आणि रायगडमधील 3 आमदारांचा यामध्ये समावेश आहे.
औरंगाबाद
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्ह्यातील कन्नडमधील आमदार राजपूत वगळता 5 आमदारांनी शिंदेंच्या मागून गुवाहाटीत पोहोचले आहेत. मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, यांच्यासह आमदार जैस्वाल, सिरसाट आणि बोरनारे हे शिंदें यांच्या बंडात सामील झाले आहेत.
सातारा, सांगली आणि कोल्हापूर
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे सुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटात गेले आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडीचे अनिल बाबर हे सुद्धा सामील झाले आहेत. कोल्हापूरचे एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरही गुवाहाटीत आहेत.
जळगाव जिल्ह्यातून आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील तसेच लता सोनवणे शिंदे गटात गेले आहेत
उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले शिदेंच्या गटात गेले आहेत
बुलडाणा जिल्ह्यातून संजय रायमुलकर व संजय गायकवाड यांचा समावेश आहे
अकोलामधून नितीन देशमुख, नांदेडमधील बालाजी कल्याणकर आणि सोलापूरमधील शहाजी पाटील यांचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Political Crisis : सगळे आमदार खूश, एकदिलानं आलोय; शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडूंची एबीपी माझाला प्रतिक्रिया
- Governor Koshyari Covid Positive : मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण
- Eknath Shinde : आनंदसेना किंवा धर्मवीर संघटना, स्वतंत्र गट स्थापून धक्का देण्याची तयारी, राजकारणातील शक्यता काय?