Maharashtra CM : शिंदे गृहखात्यावर ठाम, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातंही मागितलं; शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत तोडगा नाहीच
Maharashtra Cabinet Minister List : महायुतीमध्ये अद्याप काही खात्यावरून ताण असून महत्त्वाची खाती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तीनही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहे.
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर आला असला तरी मंत्रिमंडळाच्या काही खात्यांवरून मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. एकनाथ शिंदे यांनी गृहखाते, नगरविकास खात्यासह महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातंही शिवसेनेकडे मागितलं असल्याची माहिती आहे. त्याचवरून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वर्षा बंगल्यावरील बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यावर बुधवारी पुन्हा एकदा चर्चा होणार असून अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.
भाजपला मुख्यमंत्रिपद दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेला गृहखातं आणि नगरविकास खातं मिळावं अशी मागणी करत आहेत. त्याचसोबत महसूल खातं आणि सार्वजनिक बांधकाम खातंही शिवसेनेकडे राहावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीत तोडगा नाहीच
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने महायुतीची कोणतीही बैठक होऊ शकली नाही. त्याचमुळे मंत्रिमंडळातील कोणती खाती कुठल्या पक्षाला याचा निर्णयही झाला नाही. आता एकनाथ शिंदे यांची तब्येत ठिक आहे. त्याचमुळे यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले. या दोन नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. पण गृहखात्यावर मात्र तोडगा निघाला नाही.
गृह खाते, नगरविकास खाते शिंदेंकडे जाणार की ही खाती भाजपकडेच राहणार याचा निर्णय बुधवारी होण्याची शक्यता आहे.
महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरणार
महायुती सरकारच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बुधवारी सकाळी जाहीर होणार आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर, बुधवारी दुपारी महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत.
11 मंत्रिपदं द्या, अजितदादांची मागणी
शपथविधीला दोन दिवसांपेक्षाही कमी अवधी बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाहांकडे 11 मंत्रिपदाची मागणी करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदं हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल पटेलांसाठी केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट पद, तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पदाचीही राष्ट्रवादीची मागणी असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय.
ही बातमी वाचा: