(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप आकसापोटी : एकनाथ खडसे
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.परमबीर सिंह यांनी केलेले आरोप आकसापोटी असू शकतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
जळगाव : पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैशाची मागणी केली जात असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे म्हणाले, की या घटनेची बातमी मी काही वेळापूर्वी माध्यमातून पाहिली आहे. त्यामुळे याबाबत आताच अधिक बोलणे उचित होणार नाही. मात्र, याबाबत चौकशी मधून काय तथ्य आहे ते समोर येईलच. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची आक्षेपानंतर बदली केली जात असेल आणि त्यानंतर जर असे आरोप पोलीस अधिकऱ्याकडून होत असतील तर ते आकसापोटीही असू शकतात. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय तो खुलासा करतील. मला अजून जास्तीची माहिती नाही, माहिती होईपर्यंत अधिक बोलणे उचित होणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांच्या कोरोनाबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना झालेल्या कोरोनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करून खडसे यांना झालेला कोरोना कोणत्या प्रकारचा आहे यावर संशोधन व्हावे अशी मागणी केली होती. या विषयावर बोलताना खडसे यांनीही गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला असून आपल्याला झालेला कोरोना खरा होता. मात्र, गिरीश महाजन यांना झालेला कोरोना हा खरा आहे का की जळगाव मनपामध्ये भाजपची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. कारण गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. यंग नेता म्हणून ते परिचित आहेत. त्यामुळे त्यांचा कोरोना खरच आहे का? असा तपास केला पाहिजे. यावर संशोधन झालं पाहीजे अशा प्रकारची टीका महाजन यांच्यावर केली आहे.
मनपामध्ये गेल्या अडीच वर्षात भाजपची सत्ता होती. मात्र, या काळात पालिकेकडून कोणतीही प्रमुख विकासकामे करण्यात आली नसल्याने नागरिक आणि नगरसेवक नाराज असल्याचं पाहायला मिळाले होते. त्याचा परिणाम म्हणून 27 नगरसेवक स्वतःहून भाजप सोडून बाहेर पडतात. याचं भाजपाने आत्मचिंतन केले पाहीजे. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचं हे अपयश आहे. मात्र, सत्तेत असताना महाजन यांच्या अहंपणामुळे हे सर्व घडलं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.