(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unlock 4 Guidelines: राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ई पास रद्द; राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारी
Maharashtra Lockdown Extended: आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. येत्या 2 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी केली जाणार आहे. राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहे.
मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. येत्या 2 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी केली जाणार आहे.राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.
मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सुट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापी, खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजेसचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचीत करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी किंवा किमान 30 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी किंवा किमान 50 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.
खाजगी कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार 30 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय आणि खाजगी कार्यालये आणि आस्थापना यामध्ये निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर)ची नियुक्ती करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारिरीक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.
आता आंतरजिल्हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळ्या व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय त्यासाठी ई-परमिट / संमती / स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.
मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थाही 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. स्विमिंग पूल, करमणूक केंद्र, सिनेमा हॉल, नाट्य गृह, (मॉलमधील सिनेमाहॉलसह) बार परमीट रूमही बंदच राहतील.