Lockdown | लॉकडाऊनच्या काळात कोरोना संदर्भात 50 हजार गुन्हे दाखल, 10 हजार जणांना अटक
लॉकडाऊनच्या दरम्यान राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 10,276 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 32, 424 वाहनांवर जप्तीची कारवाईची करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49 हजार 756 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 10 हजार 276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 32 हजार 424 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबरवर 70 हजार 307 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा 555 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.
या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1 कोटी 82 लाख 76 हजार 744 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 7 अधिकारी व 23 पोलिसांना बाधा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने सात पोलीस अधिकारी व 23 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 102 घटनांची नोंद झाली असून यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
- राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी हालचाली सुरू; काही आर्थिक व्यवहारांना परवानगी
- आनंदाची बातमी! देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला : आरोग्य मंत्रालय
- धक्कादायक! कोरोनाच्या भीतीमुळे बाळासह गावी आलेल्या महिलेला कुटुंबाने प्रवेश नाकारला