Dubai Diwali : दुबईतही साजरी झाली मराठमोळी दिवाळी, 'प्रथा' आयोजित किल्ले देखाव्याला सोनाली कुलकर्णीची हजेरी
Dubai Diwali Fort : दुबईतील या किल्ले देखाव्याच्या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं खास हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मुंबई: दिवाळीत महाराष्ट्राची शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला (दुर्ग) बनवण्याची आजही प्रथा आहे. दुबईमध्ये स्थित असलेल्या 'प्रथा' या संस्थेनं यंदा हाच उपक्रम राबवत दुबईतील ममझार पार्कमध्ये एक खास कार्यशाळा आयोजित केली होती. दुबईत स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबियांनी एकत्र येत या वर्कशॉपच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांच्या गडकिल्ल्यांविषयी माहती इथं सादर केली. यंदाचं हे प्रथा दुर्ग मोहिमेचं पहिलंच वर्ष असून, यंदा इथं प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकरण्यात आली होती.
सॉलिटेअर इव्हेंट्स या कंपनीनं या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (Sonali Kulkarni) दुबईत खास हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी सोनालीनं लहान मुलांचं भरभरुन कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिलं. यंदाचं वर्ष हे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं 350 वं वर्ष आहे. त्यामुळे या कार्यक्रमात 350 दिवे लावून छत्रपती शिवाजी महाराजांना एक अनोखी मानवंदनाही देण्यात आली. ज्यात सोनाली कुलकर्णी यांचाही सहभाग होता.
प्रथा संस्थेचे संस्थापक सागर पाटील यांनी आपल्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकातल्या सवंगड्यांना घेऊन त्यांनी ही आगळीवेगळी दुर्ग मोहीम राबवली. एक दिवस रंगलेल्या ह्या वर्कशॉपची सुरुवात भूमिपूजनानं झाली. त्यानंतर किल्ल्याची आखणी व बांधकाम याचं प्रशिक्षण लहान मुलांना देण्यात आलं. मातीचं मिश्रण करून त्याचा लेप किल्ल्याला लावण्यात आला. व हुबेहूब प्रतापगडाची प्रतिकृती साकारण्यात आली. दुबईमध्ये लहान मुलांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला होता. 5 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेली ही प्रतापगडची प्रतिकृती बनवायला साधारण आठ तास लागले. ज्यात सुमारे 50 गोणी दगड व 1 टन माती वापरण्यात आली. या मोहिमेत 30 लहान मुलांनी सहभाग घेतला होता.
ही बातमी वाचा: