इंजेक्शन मागे 21 पैसे जास्त घेतल्याने औषध विक्रेत्यास 14 वर्षांनंतर 40 हजार रुपयांचा दंड
एक इंजेक्शनमागे श्री राज फार्मा यांनी 21 पैसे आकारल्या प्रकरणी श्रीराज फार्मा व त्यांच्या भागीदारास औषध नियंत्रण किंमत आदेश या कायद्याअंतर्गत 40 हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नांदेड : औषध विक्रेत्याने इंजेक्शन विक्रीत 21 पैसे जास्तीचे आकारल्या प्रकरणी न्यायालयाने तब्बल 14 वर्षानंतर 40 हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नांदेड शहरातील अपेक्स हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या श्रीराज फार्मा या औषधी विक्रेत्यास व त्यांच्या भागीदारास नांदेड येथील मुख्य न्यायालय दंडाधिकारी न्यायमूर्ती सतीश हिवाळे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
एक इंजेक्शनमागे श्री राज फार्मा यांनी 21 पैसे आकारल्या प्रकरणी श्रीराज फार्मा व त्यांच्या भागीदारास औषध नियंत्रण किंमत आदेश या कायद्याअंतर्गत 40 हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. 11 फेब्रुवारी रोजी तब्बल 14 वर्षानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. श्री राज फार्मा व त्यांच्या भागीदारांनी दंडाची रक्कम तात्काळ भरण्याचे आदेश नांदेड न्यायालयाने दिले आहेत. सदर दंडाची रक्कम श्रीराज फार्मा व त्यांच्या भागीदारांनी तात्काळ जमा केली.
श्रीराज फार्मा या मेडिकल स्टोरवरून शिवाजीनगर भागातील रहिवाशी मुन्ना आबास यांनी डॉक्टरांच्या लेखी आदेशानुसार फोर्टविन इंजेक्शन खरेदी केले होते. सदरील इंजेक्शनचा दर मूळ किमती पेक्षा 21 पैसे जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्याकडे इंजेक्शन बिलाच्या पुराव्यासह तक्रार 10-05-2007 रोजी दाखल करण्यात आली होती. संबंधित तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन औषध निरीक्षक राज बजाज गोपाल यांनी तपास केला असता श्रीराज फार्मा व मेडिकल स्टोर यांनी मुन्ना अब्बास यांच्याकडून एक इंजेक्शन मागे 21 पैसे जास्त घेतल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत न्यायालयाने श्रीराज फार्मा व त्यांच्या भागीदार सदानंद मेडेवार, श्रीकांत पतंगे,अनुसया बाई सूर्यवंशी, प्रकाश कदम, प्रदीप अग्रवाल, राहुल मेडेवार, मोहम्मद जियाउद्दीन यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणाचा निकाल तब्बल 14 वर्षानंतर लागला असून यात श्रीराज फार्मा व त्यांच्या भागीदारांना 40 हजार दंड व न्यायालय उठेपर्यंत शिक्षा नांदेड न्यायालयाने सुनावली आहे.