(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघांच्या पुढाकारातून ओसाड जागेत फुलली बाग
डॉ. विठ्ठल वाघांच्या कुंचल्यातून तयार झालेल्या अतिशय सुंदर अशा चित्रांनी. बगिच्याच्या भिंती आता बोलत आहे.
: डॉ. विठ्ठल वाघ.... मराठी साहित्याच्या प्रांतातलं मोठं नाव. 'काया मातीत मातीत तिफन चालते' या त्यांच्या कवितेनं मराठी मनावर अक्षरश: कायमचं गारूड घातलं आहे. डॉ. विठ्ठल वाघांच्या समर्थ लेखणीतून आलेल्या अशा अनेक कवितांनी शेतकऱ्यांच्या दु:खाला बोलतं केलं आहे. म्हणूनच त्यांना मराठी साहित्य वर्तुळात 'महाराष्ट्राचं लोककवी' म्हटलं जातं.
कोरोनामुळं लावण्यात आलेला लॉकडाऊन काहीसा अस्वस्थ करणारा... बराचसा कंटाळवाणाही.... मात्र, याच लॉकडाऊनच्या काळात अनेक माणसांतील सुप्त प्रतिभेनं उभारी घेतली. अन यातूनच माणसाच्या अंगातील विविध कला-गुणांचं 'नवसृजन' समाजासमोर आलं आहे. यातील अनेक नवनिर्मितींनी मानवी मनासह सृष्टी अन समाजालाही उभारी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात डॉ. वाघांच्या हातून एक असंच मोठं सृजनात्मक काम उभं राहीलं आहे. मात्र, हे काम त्यांच्यातील साहित्यिकापेक्षा त्यांची फार वेगळी ओळख सांगणारं आहे.
डॉ. विठ्ठल वाघ हे अकोल्यातील सुधीर कॉलनी भागात राहतात. त्यांच्या घराजवळ गेल्या कित्येक वर्षांपासून एक जागा ओसाड पडलेली होती. त्यावर अक्षरश: घाण आणि कचऱ्याचं साम्राज्य होतं. अगदी 'डंपिंग ग्राऊंड' म्हणावी अशी ही जागा. डॉ. वाघांना हे चित्रं तेथून येता-जाता पार अस्वस्थ करायचं. ती जागा स्वच्छ झाली पाहिजे. तिथे सुंदर झाडं आणि फुलांचा बगिचा फुलला पाहिजे, असं त्यांना नेहमी मनोमन वाटायचं. मात्र, मनातली ही इच्छा काही केल्या प्रत्यक्षात आणि पुर्णत्वास जात नव्हती.तितक्यात मार्च महिन्यात देशात कोरोना संकटाचा फेरा आला. देश, राज्य अन अकोला शहरही 'लॉकडाऊन' झालं. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी आली. ही ओसाड जागा डॉ. वाघांच्या घरापासून अगदी काही पावलांवर. मार्च महिन्यात सकाळ-संध्याकाळ वाघांनी येथे काम करायला सुरुवात केली. आधी येथील काटेरी झाड-झुडपं साफ केली. मोठ्या झाडांभोवती आकर्षक पद्धतीनं दगड रचलेत. प्रत्येक दिवस ही ओसाड जागा नवं रूप घेऊन समोर येत होती. 'वाघामूळं जंगलाला शोभा येते', असं म्हटलं जातं. साहित्यातल्या या वाघामुळे ओसाड जागेची 'बाग' झालेल्या या जागेलाही शोभा आली होती. विठ्ठल वाघांच्या श्रमप्रतिष्ठेतून हा कायापालट झाला होता.
पुढे त्यांनी बागेच्या भिंतींना रंगरंगोटी सुरू केली. अन हळू-हळू या बगिच्याच्या भिंती 'बोलायला' लागल्यात. त्यांना बोलतं केलं डॉ. विठ्ठल वाघांच्या कुंचल्यातून तयार झालेल्या अतिशय सुंदर अशा चित्रांनी. बगिच्याच्या भिंती आता बोलत आहे... चित्रातून तूम्हाला काही तरी सांगू पाहत आहेत.. त्या सांगता आहेत कोरोनाविरूद्धच्या लढाईत घ्यायची काळजी... वरली-मटक्यानं संसाराची होणारी राखरांगोळी... हे सर्व सांगणारी ही सर्व चित्र, म्हणी, वाक्प्रचार अन सुभाषितं डॉ. वाघांनी रेखाटलीत. या बागेतील भिंतीवरच्या चित्रांतून वाघांनी शेती, शेतकरी आणि आपल्या वैभवशाली परंपरेचं चित्रण केलंय. लॉकडाऊनच्या अडीच महिन्याच्या काळात या बागेचं रूप वाघांच्या पुढाकारानं पार पालटलं आहे. कधीकाळी ओसाड उकीरडा असणारी ही बाग आता चित्र, म्हणी, सुभाषितांतून समाजाला जागृत करायला लागली आहे. हे रूप बदललंय डॉ. विठ्ठल वाघांच्या भगिरथ प्रयत्नांतून.
आधी दुर्लक्ष करणारे नागरिक आता डॉ. विठ्ठल वाघांच्या 'या' चळवळीत.
आधी विठ्ठल वाघ एकटेच या बागेचं रूपडं पालटविण्यासाठी प्रयत्नरत होते. मात्र, हळू-हळू मोहोल्ल्यातील सर्वचजण त्यांच्या कामात मदत करायला लागलेत. सकाळ-संध्याकाळी हे सर्वजण वाघ यांच्यासोबत बागेत श्रमदान करतात. श्रमदान करतांना वाघांच्या खास पहाडी आवाजातील कविताही या लोकांना ऐकायला मिळतात. आता या बागेत अनेक फळ आणि फुलझाडांची लागवड केली जाणार आहे. काही मोठ्या झाडांची रोपंही आता लावली जाणार आहेत. स्थानिक नगरसेवकही आता त्यांच्या प्रयत्नांना मदतीसाठी समोर येत आहेत.
साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ कसलेले चित्रकारही
डॉ. विठ्ठल वाघ हे कथा, कविता, कादंबरी, नाटकं आणि चित्रपट गीतांच्या प्रांतातलं फार मोठं नाव. शेती प्रश्नाचे अभ्यासक-भाष्यकार, लोकप्रिय प्राध्यापक-प्राचार्यही अशी त्यांची दुसरी ओळख. मात्र, साहित्यिक-कवी डॉ. विठ्ठल वाघांचा चित्र आणि चित्रकलेसोबत काय संबंध?, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, डॉ. वाघ साहित्यिकासोबतच एक कसेलेले चित्रकारही आहेत. त्यांच्या वारली आणि चित्रकथी चित्रांमधून ते शेती, शेतकरी, ग्रामीण भागाचं समृद्ध चित्रण करीत असतात. मात्र, डॉ. वाघांच्या चित्रकारितेची स्वत:ची एक शैली आहे. तिला ते 'वाघली' शैली म्हणतात. अकोल्याचं सुधीर कॉलनीतलं त्यांचं घर म्हणजे वाघांच्या चित्रकलेचं जणू 'कलादालन'च... फुटलेल्या बांगड्यांचे काच, वाया गेलेले खिळे, तार, नट-बोल्ट्स, रद्दी कागद, पत्रिका, वाया गेलेल कपडे, चिंध्या, शिंपले, मोती, टरफलं अन लाकड अशा अनेक टाकाऊ गोष्टींतून डॉ. वाघांनी घरात अप्रतिम चित्र साकारली आहेत.
डॉ. विठ्ठल वाघ अकोल्यातील प्रख्यात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते प्राचार्य असतांना त्यांच्या चित्रांतून सजलेल्या महाविद्यालयाच्या भिंती आजही शोभा वाढवित आहेत. याच महाविद्यालयात त्यांनी तारांपासून साकारलेल्या 'मोरा'ची प्रतिकृती आजही महाविद्यालय परिसरात डौलानं उभी आहे. त्यांची दोन मुलं परदेशात लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये राहतात. या दोन्ही पोरांची घरं वाघांच्या चित्रांनी सजली आहेत.
साहित्यिक त्यांच्या साहित्यातून नवसृजनाचा आविष्कार करीत असतात. मात्र, विठ्ठल वाघांनी त्यांच्या आभाळभर साहित्याचा पाया कसा मातीशी जुळलेला आहे, हे सांगणारी ही या बागेची निर्मिती... वाघांचा हा प्रयत्न साहित्याच्या प्रवाहालाही जसा समृद्ध करणारा आहे. तसाच तो नवनिर्मितीच्या सुप्त प्रेरणेलाही बळ आणि दिशा देणारा आहे. साहित्यासोबतच माणसाचा आनंद समृद्ध करू पाहणाऱ्या डॉ. विठ्ठल वाघांतील या संवेदनशील माणुस आणि चित्रकारालाही 'एबीपी माझा'चा सलाम...
डॉ. विठ्ठल वाघांची साहित्यसंपदा :
काव्यसंग्रह : कपाशीची चंद्रफुले काया मातीत मातीत (या पुस्तकाला 'प्रियदर्शिनी' पारितोषिक मिळाले होते.) गावशीव पंढरीच्या वाटेवर पाऊसपाणी (या पुस्तकाला 'केशवसुत पुरस्कार' मिळाला होता.) साय वृषभ सूक्त पिप्पय
कादंबरी : 'डेबू' (गाडगे बाबांच्या जीवनावर)
पटकथा/गीत लेखन : अरे संसार संसार- या चित्रपटातील गीत लेखनासाठी पुरस्कार मिळाला. देवकीनंदन गोपाला-गीत, पटकथा, संवादलेखन. याबद्दल पुरस्कार मिळाला. राघू मैना - पटकथा संवाद लेखन( भूमिका : नाना पाटेकर/मधू कांबीकर) शंभू महादेवाचा नवस- गीत लेखन
दूरचित्रवाणी मालिकाः काज - पटकथा, संवाद लेखन गोट्या - पटकथा, संवाद लेखन