मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी मराठा मोर्चाने MPSC परीक्षा उधळू नये, परीक्षार्थींचं आंदोलकांना आवाहन
मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी मराठा मोर्चाने MPSC परीक्षा उधळू नये, असं आवाहन परीक्षांर्थींनी केली आहे. तर मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.
पंढरपूर : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील स्पर्धा परीक्षा घेतल्यास उधळून लावू अशी धमकी मराठा संघटनांनी दिली आहे. याला आता मराठा समाजातील परीक्षार्थी मुलांनीच विरोध केला असून असे केल्यास मराठा समाजातील वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या मुलांचे नुकसान होणार असल्याने परीक्षा होऊ द्यावी अशी मागणी या मुलांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नवीन भरतीस विरोध होता पण ही परीक्षा तीन वेळा पुढे गेली आहे. आता जर ती अजून पुढे ढकलली तर यावर्षीची परीक्षाच रद्द होईल आणि याचे सर्वात जास्त नुकसान मराठा समाजातील मुलांचे होणार असल्याचे राजवर्धन भोसले या विद्यार्थ्याने सांगितले.
राज्यसेवा पदांच्या भरतीची परीक्षा पहिल्यांदा 4 एप्रिल रोजी होणार होती. यासाठीचे पेपर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असून हॉल तिकीटही बनली होती. पुन्हा ती 26 एप्रिलपर्यंत लांबली त्यानंतर 20 सप्टेंबरपर्यंत लाभल्यावर शेवटी 11 ऑक्टोबर ही परीक्षेची तारीख निश्चित झाली आहे. या परीक्षेसाठी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून जवळपास 3 लाख मराठा समाजातील तरुण दिवसरात्र तयारी करीत असून आता ही 200 जागांसाठी असलेली परीक्षा होणे गरजेचे असल्याचे संदीप बाड या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.
मराठा आरक्षण समाजातील तरुणांना हवे आहे मात्र ही परीक्षा रद्द झाल्यास या परीक्षेसाठी तयारी करणारे आणि ज्यांची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या हजारो तरुणांना यापुढे राज्यसेवेची परीक्षा देता येणार नसल्याने मराठा संघटनांनी परीक्षा होऊ द्याव्यात. मात्र भरती प्रक्रिया सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानंतर घेण्याची मागणी करावी अशी भूमिका घेतली आहे. येत्या रविवारी ही परीक्षा होणार असून सकल मराठा मोर्चाने ही परीक्षा रद्द न केल्यास उधळून लावण्याची धमकी दिल्यानंतर हे तरुण अस्वस्थ झाले आहेत.
मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकला : विनायक मेटे
5 एप्रिल व 20 सप्टेंबर रोजी कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सद्यपरिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खेड्यापाड्यापर्यंत हे लोण पसरलेले आहे. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य व अनेक विद्याथीर्ही कोरोनाग्रस्त असल्याने त्यांना अभ्यास करून देखील परीक्षा देणे शक्य होणार नाही, असं विनायक मेटे यांनी म्हटलं.कोरोना पार्श्वभूमीवर अभ्यासिका व कोचिंग कलासेस बंद असल्यामुळे योग्य ती तयारी करू शकलेले नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. अशा विद्यार्थ्यांना, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नाहीत त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करू शकलेले नाहीत. यूपीएससी परीक्षेला 4 ऑक्टोबर रोजी याच कारणामुळे साधारणत: 30 ते 35 टक्के विद्यार्थी हजरच होऊ शकले नाही आणि अशा प्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) उमेदवारांचे देखील नुकसान होऊ शकते, असं विनायक मेटे यांनी म्हटलं.
MPSC Exam Protest | MPSCपरीक्षेवरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी