'हे' चित्रपट किंवा वेब सीरिज फुकटात डाऊनलोड करताय... सावधान!
जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारची फ्री वेबसाइट क्लिक करते, तेव्हा वापरकर्त्याच्या नकळत एखादे malware डाऊनलोड होते. याचा वापर करुन तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. सायबर गुन्हे विभागाने अशा चित्रपट आणि वेब सीरिजची यादीच जारी केली आहे.
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांना फसवण्याची एक नवी भन्नाट आयडिया समोर आणली आहे. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. यामध्ये बरेच लोक इंटरनेटचा वापर मोफत विविध प्रकारचे चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. याचाच गैरफायदा सायबर भामटे घेत असल्याचं सायबर क्राईमच्या लक्षात आलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारची फ्री वेबसाइट क्लिक करते, तेव्हा वापरकर्त्याच्या नकळत एखादे malware डाऊनलोड होते आणि ते तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मधील सर्व माहिती सायबर भामट्याला पाठवतात.
याचा वापर हे भामटे काही नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा आर्थिक गुन्ह्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे अशा वेबसाईट आणि त्यावरील चित्रपट यांची यादी देखील महाराष्ट्र सायबर खात्याने जाहीर केली आहे.
वेब सीरिजदिल्ली क्राईम (Delhi crime) ब्रूकलीन नाईण्टी नाईन (Brooklyan Nine-nine ) पंचायत (Panchayat) अकूरी (Akoori) फायदा (Fayda) घोल (Ghoul) माईण्ड हन्टर (Mind hunter) नार्कोस (Narcos) देव लोक (Dev lok) लॉस्ट (Lost)
चित्रपट
मर्दानी 2 (Mardani 2) झुटोपिया (Zootopia) जवानी जानेमन (Jawani Janeman) छपाक (Chhapak) लव्ह आज कल (Love Aj Kal) इन्सेप्शन (Inception) बाहुबली (Bahubali) रजणीगंधा (Rajnigndha) गली बॉय (Gully boy) बाला ( Bala)
लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी या चित्रपट आणि वेब सीरिजचा अधिक वापर केल्याचं सायबर टीमच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबरने विनंती केली आहे की अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेबसीरिज पाहणे शक्यतो टाळा. जर तुम्ही अशी एखादी वेब सीरिज किंवा चित्रपट डाऊनलोड केला असेल, तर तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परमिशन मागत असेल तर अशी परमिशन देऊ नका. आणि ती फाईल डिलिट करा. अधिकृत आणि खात्रीलायक वेबसाईट वरूनच चित्रपट किंवा वेबसीरिज पाहा. सोबतच तुमचा मोबाईल आणि तुमचा कॉम्प्युटरमध्ये लेटेस्ट अँटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या सूचना महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आय जी एसएससी यादव यांनी दिल्या आहेत. तशी प्रेस नोट देखील महाराष्ट्र सायबर क्राईमने प्रसिद्ध केली आहे.