Jalgoan : तुम्ही चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ पाहताय? सावधान... CBI तुमच्यावर धाड टाकू शकते
चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि लैंगिक छळ प्रकरणी सीबीआयनं जळगाव-धुळ्यासह देशभरात 14 राज्यांमध्ये कारवाई केल्याची माहिती समोर आलीय. यामध्ये जळगावातील एका शेतकऱ्याच्या घराची झडती घेतल्याचं समोर आलं आहे.
जळगाव : तुमच्याकडे चाईल्ड पॉर्नोग्राफी व्हिडीओ आहेत? तुम्ही ऑनलाईन चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च करताय? तुम्ही चाईल्ड पॉर्नोग्राफी व्हिडीओ शेअर करताय? तर तुम्ही सीबीआयच्या रडारवर याल. चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि लैंगिक छळ प्रकरणी सीबीआयनं जळगाव-धुळ्यासह देशभरात 14 राज्यांमध्ये कारवाई केल्याची माहिती समोर आलीय. सेक्स स्कँडलमुळे बदनाम झालेल्या जळगावचं नाव या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सीबीआयच्या पथकानं जळगावातल्या एका गावात येऊन एका शेतकऱ्याच्या घराची झडती घेतली आणि चौकशी केली.
या कारवाईची स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. संबंधित शेतकऱ्याच्या घरातून एक मोबाईल जप्त करण्यात आल्याचं कळतं. या घटनेत शेतकऱ्याच्या मुलानं वडिलांच्या मोबाईलवरून काही लिंक शेअर केल्या असल्याचा संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं पिता-पुत्राला नागपूर इथं चौकशीसाठी बोलावल्याचं सांगण्यात येतंय.
हे प्रकरण 2017 सालचं आहे. संबंधित शेतकऱ्याचा मुलगा अल्पवयीन असताना त्यानं अजाणतेपणाने वडिलांच्या मोबाईलवरुन चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या काही लिंक शेअर केल्याचा संशय आहे. याच कारणावरुन चौकशीसाठी सीबीआयचं पथक थेट चोपाडा तालुक्यातील धानारो गावात धडकलं होतं. सीबीआयनं यावेळी घराची झाडाझडती घेतली, संपूर्ण कुटुबांची चौकशी केली. तसेच मोबाईलही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
चाईल्ड पॉर्नोग्राफीप्रकरणी सीबीआयनं गेल्या 2 दिवसात 14 राज्यातील 76 ठिकाणी झाडाझडती घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या जळगाव आणि धुळे रडारवर आलेत.
चाईल्ड पॉर्नोग्राफी हा गुन्हा असल्याचं भारत सरकारनं आतापर्यंत अनेकवेळा स्पष्ट केलं आहे. याला आळा घालण्यासाठी POCSO Act मध्ये विशेष तरतुदी आहेत.
चाईल्ड पोर्नोग्राफी आणि शिक्षा!
- चाईल्ड पॉर्नोग्राफीचे फोटो, व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड केल्यास 3 ते 5 वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
- तुमच्य़ाकडे चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित कंटेंट आढळल्यास तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाई.
- कंटेंट गोळा करणे, इंटरनेटवर शोधणे, डाऊनलोड करणे, प्रमोशन करणे, वितरण करणे यावरही निर्बंध.
- गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार दंडात्मक कारवाई, किमान 5 हजार रुपये दंड होणार.
- दुसऱ्यांदा गुन्हा करताना आढळल्यास 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड.
महत्त्वाच्या बातम्या :
- Raj Kundra Deleted Social Media Accounts: पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्राचा ट्विटर आणि इंस्टाग्रामला रामराम
- 'स्पा'साठी जस्ट डायलला केला मेसेज, मिळाली 150 कॉलगर्ल्सची रेट लिस्ट; महिला आयोगाची 'जस्ट डायल'ला नोटिस
- सेक्स टूरिझम रॅकेटचा भांडाफोड; मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, दोन महिला अटेकत, काय आहे सेक्स टूरिझम