दिव्यांग पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, 15 दिवसांपूर्वी हत्या करुन मृतदेह शेतात पुरला
बुलडाण्यात दिव्यांग पत्नीने प्रियकर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पतीची हत्या केली. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

बुलडाणा : बुलडाण्याच्या दिव्यांग पत्नीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे 15 दिवसांपूर्वीच पतीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला. गायरान परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून 24 तासातच प्रकरणाचा उलगडा करत आरोपी पत्नी, प्रियकर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली. पतीचा मृतदेह जमिनीतून कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढून, शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गणेश सरोजकर असं मृत पतीचं नाव आहे.
मृत गणेश सरोजकर अट्टल चोर होता. त्याच्यावर पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तो नेहमी त्याच्या दिव्यांग पत्नीला मारहाण करायचा. पतीच्या या त्रासाला कंटाळलेली त्याची पत्नी लीलाचे शेजारीच राहणाऱ्या अनिलसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत गणेशला समजलं. तो पत्नी लीला आणि अनिलला जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यानंतर दोघांनी मिळून गणेशलाच संपवू, असा कट या जोडीने रचला.

त्यानंतर 25 मे रोजी माझे कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी सरकारी दवाखान्यात पैसे मिळणार आहेत, असं सांगून लीला गणेशला नाक्यावर घेऊन गेली. तिथे महेंद्र खिल्लारे याने ठरल्याप्रमाणे यांना गाडीवर बसून हातेडी इथे आणलं. तिथे अनिलचा मामा अरुण निकाळजे यांच्या शेतात जाऊन गणेशला दारुमध्ये विषारी औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढ्यावरच गणेश मरणार नाही याची खात्री झाल्यानंतर महेंद्रच्या रुमालाने चौघांनी गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचं प्रेत शेतात गाडून ठेवलं.

पंधरा दिवसांपासून गणेश गावात नाही याची माहिती बुलडाणा शहर पोलिसांना मिळाली होती. यानंतर बुलडाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 24 तासाच्या आत लीलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत तिने प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने गणेशचा 15 दिवसांपूर्वी खून करुन मृतदेह जमिनीत पुरल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आवळखेड शिवारातील अरुण निकाळजे यांच्या शेतात जाऊन कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह बाहेर काढला.
दिव्यांग पत्नी लीलाने घराशेजारी राहणारा तिचा प्रियकर अनिल प्रल्हाद सुरुशे याच्यासोबतच्या प्रेमसंबंधातून गणेश पांडुरंग सरोजकर याचा खून केला. पोलिसांनी आरोपी पत्नी लीला सरोजकर, प्रियकर अनिल सुरुशे, महेंद्र खिल्लारे आणि अरुण निकाळजे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.

या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, अभय पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, विनायक रामोड, पोलीस हेड कॉस्टेबल दिलीप पवार, अशोक गाढवे, प्रभाकर लोखंडे, शिवाजी मोरे, कोकिळा तोमर, पोलीस कॉस्टेबल अमोल शेजोळ, अमोल खराटे, गणेश बाजड, विठ्ठल काळूसे, भगवान कऱ्हाळे, रमेश वाघ सह एल.पी.सी.रामकृष्ण सुरभे, विठ्ठल आंधळे, संजय ठोबरे यांनी हे प्रकरण निकाली काढलं.
























