विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्ष पदासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा
वारकरी संप्रदायाचे दैवत असलेलं विठ्ठल मंदिर काँग्रेस पक्षाकडे गेल्याने आता मंदिर समितीचा अध्यक्ष काँग्रेस पक्षांचा होणार हे निश्चित झाले आहे. आता या पदासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू झाले असले तरी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पंढरपूर : महामंडळ वाटपात अवघ्या वारकरी संप्रदायाचे दैवत असलेलं विठ्ठल मंदिर काँग्रेस पक्षाकडे गेल्याने आता मंदिर समितीचा अध्यक्ष काँग्रेस पक्षांचा होणार हे निश्चित झाले आहे. आता या पदासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू झाले असले तरी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांना अध्यक्ष करण्याची मागणी पक्षाध्यक्षाकडे केली आहे . शिंदे कुटुंबीय हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त असून कोणतेही काम करण्यापूर्वी ते आधी विठ्ठलाचे दर्शन घेतात . सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूर साठी खूप मोठा निधी दिला होता.
काँग्रेस आघाडीत पूर्वी शिर्डी देवस्थान काँग्रेसकडे तर पंढरपूर देवस्थान राष्ट्रवादी कडे असायचे . यावेळी पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर समिती काँग्रेस कडे आल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत . विठ्ठल मंदिर समितीची वार्षिक उलाढाल 35 कोटीच्या आसपास असली तरी विठुरायाच्या दर्शनाला वर्षभरात दीड कोटी भाविक येत असल्याने या देवस्थान ताब्यात येणे काँग्रेसला महत्वाचे वाटत आहे . राज्यातील बहुजन समाजाचा देव अशी मान्यता असलेल्या विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून काम करणे फायदेशीर असल्याने काँग्रेसने अध्यक्षपदासाठी उमेदवार शोध सुरू केला आहे . यातच सदस्य पदासाठी देखील अनेक वारकरी महाराजांना काँग्रेस प्रेम वाटू लागले आहे .
मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे तर शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. शिर्डी येथील साई संस्थानचे अध्यक्षपद नेहमी काँग्रेसच्या वाटेला असायचे. परंतु यंदा मात्र काही बदल करण्यात आले आहेत. यंदा शिर्डी संस्थांनचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे.