(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhananjay Munde : बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंची माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले...
धनजंय मुंडे यांच्या झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्या झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांना याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवार आणि पक्ष नेतृत्व विचार करुन निर्णय घेतील. याबाबत मी स्वता शरद पवार यांना भेटलो आहे. त्यांना स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व सविस्तर माहिती दिली आहे. तसंच या प्रकरणाची सर्व माहिती मी प्रसारमाध्यमांना दिली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
माध्यमांशी बोलल्यानंतर धनंजय मुंडे यांनी नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जनता दरबारास उपस्थित राहून जनतेच्या भेटी घेतल्या व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर : शरद पवार
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का, याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, "धनंजय मुंडे यांनी काल मला भेटून आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यामधून तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणावरुन व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि आदेश मिळवला." "धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. या संदर्भातील निर्णय पक्ष म्हणून करावा लागले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती या नेत्यांपुढे मांडणं. त्यांची मतं जाणून घेत पुढची पावलं लवकरात लवकर उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. या प्रकरणी विलंब व्हावा असं वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ," असं शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार
नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिक आरोप नाहीत : शरद पवार
दुसरीकडे एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली आहे. त्यावरुनही विरोधक नवाब मलिकांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याबाबत शरद पवार म्हणाले की, नवाब मलिक हे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक आरोप झालेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले असून त्यांना संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. त्याचा तपास सुरु आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात आरोप नाहीत."
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?
धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.