धुळे पोलिसांनी जप्त केलेल्या तलवारी आरोपी कोठे घेऊन जाणार होते? सुरक्षा यंत्रणांसमोर प्रश्न
Dhule News : पेट्रोलिंग करताना धुळे पोलिसांनी 89 तलवारी जप्त केल्या आहेत. धुळ्यातील सोनगीर पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
Dhale News Update : धुळे पोलिसांनी काल जप्त केलेल्या तलवारींच्या साठ्यामुळे राज्याची पोलीस यंत्रणा खरबडून जागी झाली आहे. पोलिसांनी यावेळी चार अरोपींनाही अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी जालना येथील असून त्या तलवारी जालना येथे घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, एवढ्या तलवारी नेमक्या कुठे आणि कशासाठी घेऊन जाण्यात येत होत्या? हा प्रश्न आता पोलीस यंत्रणेसमोर उभा राहिला आहे.
धुळे पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावरील जालन्याकडे जाणाऱ्या रोडवर सोनगीर पोलीस ठाण्याच्या 500 मीटर अंतरावर पांढऱ्या रंगाच्या स्कार्पियोमधून तब्बल 89 तलवारी आणी एक खंजीर जप्त केला आहे. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी वेगात जात असलेल्या स्कार्पिओला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी अधिक वेगात पळवल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पाठलाग करून पोलिसांनी गाडी आडवली. यावेळी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असताना आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीत मोठा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी गाडीसह हा शस्त्रसाठा जप्त केला आणि चार आरोपींना अटक केली.
मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम आणि कपिल दाभाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे चारही जण जालना शहरातील चंदनजीरा भागातील रहिवासी आहेत.
आरोपींकडे आढळलेल्या तलवारी राजस्थानमधील चित्तोडगड येथून खरेदी केल्याचा संशय आहे. या सर्व तलवारी जालना येथे घेऊन जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, जालना शहरात एवढ्या तलवारींचा साठा कशासाठी येत होता हा गंभीर प्रश्न सुरक्षा यंत्रणे समोर उभा राहीला आहे.
अटकेलील गुन्हेगार रेकॉर्डवरील
धुळे पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी जालना पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी चारही आरोपींवर चंदनजीरा पोलीस ठाण्यात भांडण, मरामारी आणि हत्याराने जाणीवपूर्वक इजा केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी आणि त्यांच्यावरील गुन्हे
1) मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक या आरोपीवर जालन्यातील चंदनजीरा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. (कलम 12 (अ)मजूका ,कलम 268)
2) शेख इलियास शेख लतीफ या आरोपीवर चंदनजीरा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.(कलम-354,223,294,504,268)
3) सय्यद नईम सय्यद रहीम याच्यावर चंदंजिरा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. (कलम 326,147,148)
4) कपिल दाभाडे याच्यावरही चंदंजिरा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. (कलम-307,323,324,504)
यापूर्वी औरंगाबादमध्ये पोलिसांनी जप्त केल्या होत्या तलवारी
यापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये देखील क्रांती चौक पोलिसांनी कुरियर मार्फत आलेल्या 7 जणांच्या नावावरील 37 तलवारी जप्त केल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. औरंगाबाद दंगलीनंतर पोलिसांनी 2018 मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्र जप्त केली होता. जुलै 2021 रोजी औरंगाबाद पोलिसांनी 41 तलवारी आणि 2 गुप्ती देखील जप्त केल्या होत्या. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये या तलवारी पाठवण्यासाठी कुरियरचा वापर केला होता.
महत्वाच्या बातम्या