VIDEO : बेलापूरमधून मंदा म्हात्रेच जिंकतील, बंडखोर उमेदवारांची लायकी समोर येईल; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचा संदीप नाईकांवर हल्लाबोल
Navi Mumbai Politics : बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात संदीप नाईक यांनी तर विजय चौगुले आणि विजय नहाटे यांनी बंडखोरी केली आहे.
Navi Mumbai Politics : नवी मुंबईत बंडखोरी झाली असली तरी ऐरोली विधानसभेतून गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभेतून मंदा म्हात्रे हे भाजप उमेदवार जिंकतील असा विश्वास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. निकाल लागल्यानंतर बंडखोरांना त्यांची लायकी समजेल असा इशाराही त्यांनी दिला. बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमदवारी मिळवली. तर महायुतीच्या विजय नहाटा यांनीही बंडखोरी केली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही बंडखोरांना इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रचारासाठी वेळ कमी मिळाला आहे. फक्त 13 दिवस प्रचाराचे मिळाले आहेत. त्यामुळे रोज पाच सहा सभा करतोय. आता कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलोय. बेलापूर विधानसभेत मंदा म्हात्रेंसाठी भाजपा पूर्ण ताकतीने उतरली आहे. नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा भाजपा जिंकेल. मला पूर्ण आत्मविश्वास आहे की राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार निवडून येणार आहे. "
बंडखोरांची लायकी समजेल
देवेद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये आपापसात कुरघोडी सुरू आहे. नवी मुंबईतही आपल्या पक्षात बंडखोरी झाली आहे. आम्ही कुणाला कमी लेखत नाही. आपली ताकद आजमावू. बंडखोरांनीही त्यांच्या ताकदीचा अंदाज घ्यावा. म्हणजे त्यांची लायकी काय आहे हे समजेल. 23 तारखेला विजयी सभा घेण्यासाठी मी नवी मुंबईत येणार आहे."
झोपडपट्टीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप
नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघात विरोधी पक्षांकडून मतदारांना पैशांचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. बेलापुरातल्या झोपडपट्टी भागात पैशांचं वाटप करून मतदारांना प्रलोभनं दाखवण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
संदीप नाईक यांचा नवमतदारांशी संवाद
नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप गणेश नाईक यांनी "आपला आवाज, आपले भविष्य " या सदराखाली प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्ये मिसळून संवाद साधला. या संवादा दरम्यान नवमतदारांनी संदीप नाईक यांच्या समोर त्यांच्या दैनंदिन शैक्षणिक व शिक्षणोत्तर जीवनात भेडसावणाऱ्या समस्या आपल्या निवेदनातून मांडल्या. तर, नवमतदारांनी दर्शविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी आपण तळमळीने क्रियाशील राहून काम करणार आश्वासन संदीप नाईक यांनी दिले.
ही बातमी वाचा: