Nawab Malik : मलिकांवरून फडणवीसांचे अजित पवारांना पत्र; वडेट्टीवार म्हणतात, भाजप हा धूर्त पक्ष असून...
Devendra Fadnavis Letter to Ajit Pawar : . नवाब मलिक यांच्या वादातून भाजपला दोन हात लांब राहायचे असेल. भाजप हा धूर्त राजकारण्यांचा पक्ष आहे, ते याच्यातून मार्ग काढतील असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. फडणवीस यांचे पत्र हे महायुतीच्या रणनीतीचा एक भाग असण्याची शक्यता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वर्तवली आहे. नवाब मलिक यांच्या वादातून भाजपला दोन हात लांब राहायचे असेल. भाजप हा धूर्त राजकारण्यांचा पक्ष आहे, ते याच्यातून मार्ग काढतील असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नव्हते. दुर्दैवाने त्यांना तुरुंगात राहावं लागलं. नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र लिहून करत अजित पवार गटाला पाठिंबा दिला हे मात्र खरं असल्याचे त्यांनी म्हटले. त्यापुढे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत आहे म्हणजेच महायुती सोबत आहे. आज विधान परिषदेत आरोप झाल्यानंतर एक रणनीतीचा भाग म्हणून फडणवीस यांनी पत्र लिहिले असेल किंवा ट्विट केला असेल. उलट पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून नवाब मलिक यांना त्यांच्या मतदारसंघासाठी भरपूर निधीही दिला आहे आणि तो निधी त्यांना महायुतीचा आमदार असं गृहीत धरून दिला असल्याचा असल्याचा दावा त्यांनी केला. आता भाजपला या वादातून सुटका मिळवायची असेल म्हणून फडणवीस यांचा पत्र लिहून तसा प्रयत्न असावा. ही मुळीच महायुतीमध्ये वादाची सुरुवात नाही. तर हे पत्र म्हणजे महायुतीच्या रणनीतीचा भाग असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
भाजप हा धूर्त राजकारण्यांचा पक्ष
नवाब मलिक यांचा उल्लेख सभागृह मध्ये यापूर्वी देशद्रोही म्हणून केला गेला. त्यामुळे देशद्रोही माणूस आपल्या बाजूला बसला तर अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यातून आपली सुटका व्हावी यासाठी हे प्रयत्न असावे. महायुतीला नवाब मलिक हे सोबतही पाहिजे आणि जवळ ही नको असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप हुशार पक्ष आहे फार हुशार आणि धूर्त राजकारण्यांचा पक्ष आहे, ते याच्यातून मार्ग काढतील.. नवाब मलिक यांना आम्ही निमंत्रण देणार नाही.. आम्ही आता विरोधात आहोत तसही तो राष्ट्रवादीशी संबंधित प्रश्न आहे आमच्या पक्षाशी संबंधित नाही असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.