(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon : राजकीय फायद्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील आमच्यावर अरोप करतायेत, कुटुंबियांनी आरोप फेटाळले
जळगावात रविवारी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या तरुणांच्या कुटुंबियांपैकी राजपूत कुटुंबानं सर्व आरोप फेटाळले आहेत.
जळगाव : काल जळगावात धक्कादायक प्रकार घडून आला. जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत ते थोडक्यात बचावले. या घटनेच्या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून चार संशयितांच्या विरोधात जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ज्या चार जणांनी हा गोळीबार केला असल्याचा आरोप उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केला होता. त्यातील राजपूत कुटुंबियांनी मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेले गोळीबाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय फायदा घेण्यासाठी आमच्या कुटुंबावर हे अरोप करण्यात येत आहेत. या घटनेच्या संदर्भात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाची निष्पक्षपणे पोलिसांनी चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करणारं निवेदन राजपूत कुटुंबियांच्या वतीने आज पोलिसांना देण्यात आलं.
जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर चार जणांनी गोळीबार केल्याचं सांगितलं जात होतं. त्यातील राजपूत कुटुंबियांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून गोळीबार झाल्याच्या घटनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. गोळीबार झाला किंवा नाही, त्यात तो कोणी केला, की करवला गेला? हे पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. मात्र आमच्या कुटुंबातील तरुणांनी हा गोळीबार केला नसल्याची भूमिका राजपूत कुटुंबातील महिलांनी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे.
राजपूत कुटुंबातील तरुणांचे क्रिकेट खेळताना दुसऱ्या तरुणांशी वाद झाले होते हे खरे आहे. हा वाद पोलीस ठाण्यात गेला असताना तो वाद मिटविण्याची जबाबदारी पोलिसांची असताना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मध्ये येण्याची आवश्यकता नव्हती, वाद मिटवताना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीच आमच्या कुटुंबाला जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोपही राजपूत कुटुंबातील महिलांनी केला आहे.
कुलभूषण पाटील यांनी आमच्या कुटुंबातील मुलांची नावे पोलीस ठाण्यात गुन्हेगार म्हणून दिल्याने त्यांची समाजात बदनामी झालीआहे. सुशिक्षित कुटुंबातील असताना या बदनामीमुळे हे तरुण खोट्या आरोपांमुळे खरंच गुन्हेगार होण्याची भीतीही या कुटुंबानं व्यक्त केली आहे. जोपर्यंत या मुलांनी गुन्हा केला आहे ते सिद्ध होत नाही. तोपर्यंत त्यांना गुन्हेगार म्हणून पोलिसांनी वागणूक देऊ नये आणि माध्यमांनीही त्यांना गुन्हेगार म्हणून संबोधित करू नये अशा प्रकारची मागणीही त्यांनी या यावेळी केली आहे. या घटने नंतर आमचे सर्व कुटुंब घाबरल्यामुळे आमची मुलं ही फरार झाली असली तरी लवकरच ते पोलिसांच्या पुढे हजर होतील, असा दावाही राजपूत कुटुंबातील महिलांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jalgaon : धक्कादायक... जळगावात क्षुल्लक कारणावरुन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार