Delta Plus advances in Maharashtra : राज्यात डेल्टा व्हेरियंटची धास्ती; आतापर्यंत 76 रुग्णांना लागण, लस घेतल्यांचाही समावेश, परिस्थिती काय?
Delta Plus advances in Maharashtra : राज्यात डेल्टा व्हेरियंटची धास्ती, आतापर्यंत 76 रुग्णांना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाली असून यामध्ये लस घेतलेल्यांचाही समावेश आहे.
Delta Plus advances in Maharashtra : राज्यात कोरोना प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाली आहे. राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असताना, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. सध्या डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णांनी राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात काल (सोमवारी) कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्या 10 रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे, कोरोनाची लस घेतलेल्या रुग्णांनाही डेल्टा व्हेरियंटची लागण होत आहे.
सध्या राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 76 रुग्ण आहेत. तर यापैकी लस घेतलेल्या 18 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत राज्यात 5 डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (सोमवारी) राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्या 10 रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी सहा कोल्हापूर तीन रत्नागिरी तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण आहे.
राज्यातील डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या एकूण 76 रुग्णांपैकी 10 रुग्णांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले होते, तर 12 लोकांनी लसीचा एक डोस घेतला होता. या रुग्णांमध्ये 39 महिलांचा तर नऊ लहान मुलांचा समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मुलांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे.
डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्यात तपासण्या करण्यात येत आहे. सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटीग्रेटिव बायोलॉजीच्या वतीनं 10 हजारांहून अधिक नमुन्यांची चाचणी केली आहे. राज्याचे स्टेट सर्विलांस ऑफिसर डॉक्टर प्रदीप अवाटे यांनी सांगितलं की, "अद्याप कोणत्याही राज्यात जीनोमिक तपासणीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नमुने पाठवण्यात आलेले नाहीत."
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्यांची रुग्ण संख्या :
मुंबई : 11
जळगाव : 13
रत्नागिरी : 15
कोल्हापूर : 07
ठाणे : 06
पुणे : 06
रायगड : 03
पालघर : 03
नांदेड : 02
गोंदिया : 02
सिंधुदुर्ग : 02
चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद,बीड याठिकाणी डेल्टाचा प्रत्येकी एक रुग्ण
राज्यात काल (सोमवारी) 4,145 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल (सोमवारी) 4,145 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 811 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 95 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.86टक्के आहे. राज्यात आज 100 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :