पायातील हाडाच्या साहाय्याने दूर केले लहान मुलीच्या जबड्याचे व्यंग
जबड्यातील ती गाठ काढण्याकरिता 10-12 निष्णात डॉक्टरांचे पथक 10 तास शस्त्रक्रिया करत होते.
मुंबई : नुकतंच एक वर्ष वय पूर्ण केलेली ध्रुवी देवरुखकर सर्वसाधारण इतर मुलींसारखीच मात्र सहा महिन्याची असताना तिच्या उजव्या जबड्यात गाठ निर्माण झाली ती दोन महिन्यात एवढी मोठी झाली कि त्यामुळे ध्रुवीच्या चेहऱ्यावर व्यंग जाणवू लागले. तिला खाताना प्रचंड त्रास होऊ लागला पालकांनी वेळेचं इलाज करण्याचे ठरविले आणि तीन महिन्याच्या त्याच्या या प्रयत्नानंतर तिच्यावर परळ येथील वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जबड्यातील ती गाठ काढण्याकरिता 10-12 निष्णात डॉक्टरांचे पथक 10 तास शस्त्रक्रिया करत होते. विशेष म्हणजे गाठ काढल्यानंतर जबड्याला आधार मिळावा म्हणून तिच्या पायातील हाडाचा वापर करून प्लेटच्या साहाय्याने ते व्यंग दूर करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. इतक्या लहान मुलींवर इतकी मोठी शस्त्रक्रिया करण्याची डॉक्टरांची आणि वाडिया रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
भिवंडी येथे राहणाऱ्या देवरुखकर दांपत्याला ज्यावेळी त्याची मुलगी ध्रुवीचा चेहरा उजव्या बाजूने सुज आल्याचे जाणवत होते. त्याशिवाय ती सहा महिन्याची असताना त्यांना तिच्या जबड्यात काही तरी गाठ असल्याचे जाणवले. त्यावेळी त्यांनी काही त्यांच्या परिसरातील डॉक्टरांना दाखविले मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
ध्रुवीचे वडील महेंद्र देवरुखकर यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, " जेव्हापासून आम्हाला तिच्या जबड्यात गाठ आहे हे कळले आम्ही तिला विविध डॉक्टरांकडे घेऊन गेलो. या सर्व प्रक्रियेत दोन महिन्यात गाठ एवढी मोठी झाली कि तिच्या चेहऱ्यावर व्यंग निर्माण झाले. तिला खाताना त्रास आणि बोलताना त्रास होऊ लागला. तेव्हा मात्र आम्ही नायर रुग्णालयात तिचा सी टी स्कॅन केला तेव्हा लक्षात आले की गाठ मोठी असून त्यांची बायोप्सी करावी लागणार आहे. त्याकरता आम्हाला के इ एम किंवा वाडिया रुग्णालयात जाण्याच्या सल्ला दिला त्यानुसार आम्ही लहान मुलांच्या वाडिया रुग्णालयात गेलो. तेथे काही तपासण्या केल्या. त्यावेळी ती गाठ कॅन्सरची नसल्याची निदान झाले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी ही गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेबाबत सविस्तर माहिती समजावून सांगितली. त्यानुसार मग ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याप्रकणी वाडिया रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉ निलेश सातभाई यांनी सांगितले की, " या अशा पद्धतीची शस्त्रक्रिया लहान मुलींवर मी पहिल्यांदाच केली आहे. मोठ्या वयाच्या व्यक्तीवर जबड्याच्या कर्करोगासाठी अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. मात्र लहान मुलीवर या रुग्णालयात आणि माझ्या करिअर मधील ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया होती. नक्कीच 9 महिन्याच्या बाळाच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करण्याचे काम आवाहनात्मक होते. मात्र आम्ही महिनाभर व्यवस्थित योजना आखून ही शस्त्रक्रिया केली. बराच काळ सर्व तपासण्या करण्याकरताच गेला. यासाठी आम्हाला, माझ्या सोबत आणखी 5-6 प्लास्टिक सर्जन, ई एन टीचे आणि ऍनेस्थेशियाचे डॉक्टर होते. या करीता आम्हाला 10 तास शस्त्रक्रियेसाठी लागले."
ते पुढे सांगतात की, " पहिले आम्हाला तिच्या जबड्यातील 5 x 7 सेंटीमीटरची गाठ काढली. त्यामुळे त्या ठिकाणी मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्याठिकाणी जबड्याला आधार मिळावा म्हणून तिच्या पायातील हाडाचा भाग घेऊन आणि प्लेटच्या साहाय्याने तो जबडा व्यवस्थित करण्यात आला. त्याठिकाणी त्या हाडाला सर्व सूक्ष्म अशा रक्तवाहिन्या जोडण्यात आल्या. त्यांचा रक्तप्रवाह व्यवस्थित होत आहे की नाही ते पाहण्यात आले. याकरिता शस्त्रक्रिया झाल्यानंतरही आम्ही ध्रुवीकडे बारकाईने नजर ठेवून होते. कोणते बदल होत आहेत हे सातत्याने पाहत होते. मात्र आज चार महिन्यानंतर ती व्यवस्थित आहे. तिला आता सध्या तरी कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तिच्या चेहऱ्यावरचे व्यंग आता दूर झाले आहे."
तर लहान मुलांसाठी स्वतंत्र असण्याऱ्या या वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिनी बोधनवाला सांगतात की, " वाडिया रुग्णालयात लहान मुलांच्या बाबतीत असणाऱ्या असंख्य जातील शस्त्रकिया केल्या जातात. त्याचप्रमाणे ध्रुवी जी शस्त्रक्रिया आमच्या रुग्णालयात करण्यात आली ती सुद्धा आमच्यासाठी एक आव्हानच होती. मात्र आमच्या येथील तज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या साहाय्याने आम्ही शस्त्रक्रिया करू शकलो. या अशा पद्धतीची आमच्या रुग्णलायतील ही पहिलीच शस्त्रकिया आहे."