पाण्याच्या बाटलीवरुन वाद, मग मुख्यमंत्र्यांवर हल्ला होणार असल्याची खोटी माहिती दिली; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जातोय अशी माहिती अविनाश वाघमारे याने पोलिसांना दिली होती.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अविनाश वाघमारे असं त्याचं नाव असून लोणावळा पोलिसांनी (Pune Rural Police) त्याला अटक केली आहे. या व्यक्तीने खोडसळपणे हे कृत्य केलं असल्याचं समोर आलं आहे. हॉटेल मालकाशी पाण्याच्या बाटलीवरुन वाद झाल्यानंतर त्याने ही खोटी माहिती दिली होती. लोणावळा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पाण्याच्या बाटलीवरुन वाद, थेट पोलिसांना फोन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय अशी खोटी बतावणी अविनाश वाघमारे याने केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. अविनाश वाघमारे हा घाटकोपरला राहतो. एका हॉटेलमध्ये पाण्याची बॉटल घेण्यावरून त्याचा वाद झाला होता. बॉटलमागे पाच रुपये अधिकचे का घेतले जातात असा जाब त्याने हॉटेल मालकाला विचारला. परवडत नसेल तर दुसरीकडे जा, असं प्रत्युत्तर हॉटेलवाल्याने त्याला दिले.
हॉटेल मालकाच्या या उत्तरामुळे अविनाश वाघमारे संतापला. मग त्याने हॉटेलमागे पोलिस लावायचा विचार केला. यासाठी त्याने थेट शंभर नंबरवर कॉल केला आणि संबंधित हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा कट रचला जातोय अशी बतावणी केली. मुंबईवरून सांगलीला खाजगी बसने जाताना लोणावळ्यात हा प्रसंग शनिवारी रात्री घडला. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी तसेच वर्षा या शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कडक तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
या आधीही मुख्यमंत्र्यांना धमकी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आधीही धमक्या देण्यात आल्या होत्या. आषाढी वारीच्या वेळी त्यांना धमकी मिळाली होती. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडूनही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यासंबंधीही पोलिस तपास करत आहेत. आता शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) हा बीकेसीवर (BKC) होणार आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर काही मोजकेच लोक असतील असंही समजतंय.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
