Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृ्त्यमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना विमा कंपन्या किती पैसे देणार? समोर आली महत्त्वाची अपडेट
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण 265 जणांचा मृत्यू झाला. विमानातील 241 जणांचा समावेश. टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांची मदत.

Air India Plane Crash in Gujarat: अहमदाबाद विमानतळापासून काही अंतरावर गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये स्फोट होऊन संपूर्ण विमानाचे तुकडे झाले होते. स्फोटामुळे आग लागून विमानातील 239 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. यानंतर एअर इंडियाची मालकी असणाऱ्या टाटा समूहाकडून विमान अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे टाटा समूहाने जाहीर केले होते.
टाटा समूहाने अपघात झालेल्या बोईंग ड्रीमलानयर विमानाचा विमा उतरवला होता. त्यामुळे टाटा समूहाला अपघातात विमानाचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळेल. तर करारानुसार एअर इंडियाला मृताच्या कुटुंबीयांना 1.5 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये एअर इंडियाकडून नुकसान भरपाईसंदर्भात घोषणा केली जाऊ शकते. 1999च्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शननुसार, मृतांच्या कुटुंबीयांना होणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली जाईल. त्यासाठी एसडीआरचा निकष ग्राह्य धरला जाईल. ऑक्टोबर 2024 पर्यंत एसडीआर 128821 इतका होता. मात्र, एअर इंडियाने किती रुपयांचा विमा काढला होता, यावरुन नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होईल.
प्रुडंट इन्शुरन्स ब्रोकर्स कंपनीचे एव्हिएशन आणि स्पेशालिटी लाईन्सचे उपाध्यक्ष हितेश गिरोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा अपघात झाल्यानंतर संबंधित कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते. या अपघातात एका इमारतीचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे एअर इंडियाला त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी लागेल. या अपघातातील मृतांच्या सर्व कुटुंबीयांना जवळपास 360 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते.
टाटा समूहाची विमा कंपनी देणार नुकसान भरपाईची रक्कम
टाटा ग्रूपची विमा कंपनी त्यांची परदेशातील भागीदार असलेल्या AIG कंपनीसह नुकसान भरपाईचे पैसे अदा करेल. एअर इंडियाने 1 एप्रिलला Tata AIG या कंपनीकडून 20 बिलियन डॉलर्स म्हणजे 1 लाख 71 हजार कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. या पॉलिसासाठी एअर इंडिया प्रायमरी इन्शुरर होती. तर टाटा AIG जनरल इन्शुरन्स, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स हे जनरल इन्शुरर होते. एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील 300 हून अधिक विमानांचा विमा उतरवण्यासाठी तब्बल 30 लाख डॉलर्सचा प्रीमिअम भरला होता. त्यानुसार आता बोईंग ड्रीम लाईनर विमानाला किती वर्षे झाली होती आणि अन्य घटकांचा विचार करुन विम्याची रक्कम ठरवली जाईल. ही रक्कम 211 मिलिअन डॉलर्स ते 280 मिलिअन डॉलर्स इतकी असू शकते.
अपघात झालेल्या विमान किती वर्षे वापरले आहे यावरुन त्याचे सध्याचे मूल्य 75 ते 80 मिलियन डॉर्लस असू शकते. याचा अर्थ एअर इंडियाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून 680 ते 980 कोटी मिळू शकतात. त्यानुसार एअर इंडिया मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देईल, असे सांगितले जात आहे.
आणखी वाचा























