सत्तारांच्या वक्तव्याने शिंदे गट-भाजपा युती की मैत्रीपूर्ण लढत? भाजप राजकीय कुस्तीच्या तयारीत, रावसाहेब दानवेंचा टोला
Aurangabad : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिंदे गट-भाजप मैत्रीपूर्ण लढत नको तर राजकीय कुस्ती हवी असा टोला लगावला आहे.
औरंगाबाद : राज्यात भाजपा-शिंदे गट सत्तेत असला तरी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या मधला वाद काही संपलेला दिसत नाही. काल सत्तार यांनी माझ्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती नको तर मैत्रीपूर्ण लढत असावी असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना मैत्रीपूर्ण कसली, कुस्ती हवी असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे नगारे वाजण्याआधीच दोघांचा शाब्दिक वाद मात्र पुन्हा एकदा रंगला आहे.
'तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' या मराठीतल्या म्हणीप्रमाणे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या युतीवरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामध्ये जुंपली आहे. राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं पाहायला मिळत असतानाच अब्दुल सत्तारांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. कारण आगामी स्थानिक निवडणुकीत माझ्या मतदारसंघात भाजप नकोच अशी भूमिका घेत मैत्रीपूर्ण निवडणूक व्हावी असं अब्दुल सत्तार यांनी थेटपणे बोलून दाखवल आहे. एवढेच नाही तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी भूमिका घ्यावी असेही सत्तार म्हणाले.
मंत्री अब्दुल सत्तार एवढ्यावरच थांबले नाही तर माझ्या मतदारसंघासारखी इतर ठिकाणी जर परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अशीच मैत्रीपूर्ण लढाई व्हावी असेही सत्तार म्हणाले. मंत्रिमंडळाच्या विस्तारात अब्दुल सत्तारांना भाजपचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना संधी दिली. त्यातच काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापूर्वीच सत्तार यांनी माध्यमांमध्ये जाहीर करून टाकला. त्यावेळीसुद्धा फडणवीसांनी सत्तार यांचे कान टोचले होते. त्यामुळे भाजप आणि सत्तार हे गणित काही जुळता जुळत नसताना आता सत्तारांनी माझ्या मतदारसंघात भाजप नकोच अशी भूमिका घेतलीय. तर सत्तार कुणाचेच होत नाहीत, ते उद्या शिंदे गटात राहतील की नाही याचीही खात्री नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे,
एकीकडे शिंदे गटावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपाला भाजपचे नेते ढाल बनून उत्तर देत आहे, मात्र दुसरीकडे त्याच शिंदे गटातील सत्तार मात्र निवडणुकीत भाजपला सोडून मैदान मारण्याची भाषा करतात. यामुळे शिवसेना भाजपा युती स्थानिक स्वराज्य संस्थांत पाहायला मिळणार की मैत्रीपूर्ण लढत हा प्रश्न उपस्थित होत आहे.