अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या आणखी एका संपत्तीचा लिलाव; रत्नागिरीतील रविंद्र काते यांची 1.1 कोटींची बोली
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील संपत्तीचा लिलाव करण्यात आला असून रत्नागिरीत राहणाऱ्या एका ग्रामस्थांनी ही संपत्ती विकत घेतली आहे. रविंद्र काते यांनी या संपत्तीसाठी एक कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली आहे.
रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या लिलावांचं सत्र सुरु आहे. आता दाऊदच्या खेड येथील संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे. जी रत्नागिरीमध्येच राहणाऱ्या एका रविंद्र काते यांनी खरेदी केली आहे. लिलावादरम्यान, रविंद्र काते यांनी या संपत्तीसाठी एक कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली आहे. जी सर्वात मोठी बोली होती. दरम्यान, दाऊद यांच्या संपत्तीसाठी ऑनलाईन लिलाव करण्यात आला. ज्याचं आयोजन स्मग्लर अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (एसएएफईएमए) प्राधिकरणाने केलं होतं.
1.10 कोटींना खरेदी केली दाऊदची संपत्ती
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्ये राहणाऱ्या रविंद्र काते यांनी दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीसाठी एक कोटी 10 लाखांहून अधिक बोली लावली आणि विकत घेतली. दरम्यान, या संपत्तीची बेस प्राइज एक कोटी 9 लाख 15 हजार 500 रुपये ठेवण्यात आली होती.
नोव्हेंबरमध्ये होणार होता लिलाव
दाऊदची संपत्तीमध्ये 80 गुंठे जमिनीचा समावेश होता. जिचा नोव्हेंबरमध्ये इतर संपत्तींसोबत लिलाव होणार होता. त्यावेळी एसएएफईएमए प्राधिकरणाला एका तांत्रिक अडचणीची माहिती मिळाली, त्यामुळे या संपत्तीचा लिलाव थांबवण्यात आला होता.
दरम्यान, याआधी काही वर्षांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जप्त केलेल्या मुंबईतील संपत्तीचाही लिलाव करण्यात आला होता. डांबरवाला बिल्डिंग, हॉटेल रौनक अफरोज, शबनम गेस्ट हाऊस या मुंबईतील संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता. तसेच दाऊदची हिरव्या रंगाची कार स्वामी चक्रपाणी यांनी 32,000 रुपयांत खरेदी केली होती. यानंतर ही कार दहशतवादाचं प्रतीक असल्याचं सांगत गाझियाबादमध्ये ती पेटवून दिली होती.