दापोलीच्या वयोवृध्द महिलांच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा उलगडा, रत्नागिरी पोलिसांना यश
रत्नागिरी आणि दापोली पोलिसांनी दमदार कामगिरी करत दापोली येथील वयोवृध्द महिलांच्या तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
दापोली : दापोली येथील वयोवृध्द महिलांच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना अखेर यश आलं आहे. आर्थिक कारणावरून गुन्ह्याचे अमानुष कृत्य केल्याची कबुली आरोपीकडून देण्यात आली आहे. ऐन संक्रांतीच्या सणादिवशी म्हणजेच 14 जानेवारी, 2022 रोजी दापोली तालुक्यातील मौजे वणौशी येथे अज्ञात व्यक्तीने एका घरात राहणाऱ्या तीन वयोवृद्ध महिलांना (76 वर्षे, 76 वर्षे आणि 101 वर्षे) जीवे ठार मारुन त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि घरातील पैसे चोरीस गेल्याची अत्यंत क्रूर घटना घडली होती.
या घटनेबाबत दापोली पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. सदर महिला या एकट्याच रहात होत्या तशाच शेजारच्या घरातील लोकही कामानिमित्ताने मुंबईत असल्याने गुन्ह्याचा तपास करणं अवघड होतं. पण घडलेल्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी जोमात तपास सुरु केला. गुन्ह्याचे घटनास्थळ हे कमी लोकवस्तीचे ग्रामीण भागातील असल्याने तसेच आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्हयाचा उलगडा होण्याकरीता पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण करण्यापासून आरोपीचा शोध घेण्यापर्यंत वेगवेगळी कामे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना नेमून दिली.
या तपासातून सदर महिला गावांतील गरजू लोकांना पैसे देत असल्याने त्यांच्याकडे पैशाची उपलब्धता असल्याने ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसानी तपास सुरु केला. ज्यात विविध लोकांची चौकशी करण्यास सुरुवात झाली. त्यानुसार गावचा रहिवाशी मात्र सध्या मुंबईत असणारा रामचंद्र वामन शिंदे (वय 53 वर्षे) याच्यावर अधिक संशय असल्याने त्याचा कसून तपास करण्यात आला. तपासादरम्यान रामचंद्र शिंदे याने वेगवेगळ्या पोलीस पथकाला वेगवेगळी माहिती दिली. त्यामुळे त्याची अधिक कसून तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
कर्जबाजारी असल्याने केला गुन्हा
कर्जबाजारी असणाऱ्या आरोपीला पैशाची अत्यंत गरज असल्याने तसेच संबधित तीनही महिला घरात एकटयाच असल्याने त्यांना मारुन चोरी करण्यासाठी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा -
-
डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश
- BMCतील भ्रष्टाचारप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार; पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक;चंद्रकांत पाटील म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha