मराठवाड्यातील नुकसान जलयुक्त शिवारमुळे! पर्यावरणतज्ञांचं मत, भाजपनं दावा फेटाळला, नेमकं काय आहे प्रकरण?
Maharashtra Marathwada Rain Update : मराठवाड्यात झालेली जलयुक्त शिवारची काम जबाबदार नुकसानीला असल्याचं मत पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केलं आहे.यावरुन चांगलाच वाद पेटला आहे.
Maharashtra Marathwada Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील या नुकसानीला मराठवाड्यात झालेली जलयुक्त शिवारची काम जबाबदार असल्याचं मत पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केलं आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान
विभागीय आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 35 लाख 64 हजार 391 इतकी आहे. 90 टक्के पंचनामे झाल्याचा दावा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
Maharashtra Rain : आभाळ फाटलं! 'गुलाब' वादळाचे 'काटे' शेतकऱ्यांच्या अंगाला, बळीराजाचं अतोनात नुकसान
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये झालेल्या या नुकसानीला जलयुक्तची कामंच जबाबदार असल्याचा निष्कर्ष पर्यावरणतज्ञानांनी काढलाय. महाराष्ट्र जलयुक्तची कामे झाली. नदी ,ओढा नाल्यातून गाळ काढून बाजूलाच टाकला गेला आणि हा गाळ पुन्हा नदी नाल्यात येऊन नदीत आल्यानं सपाटीकरण झालं. त्यानंतर आता अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पाणी पात्र सोडून शेतामध्ये घुसलं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांचं म्हणणं आहे.
पर्यावरण तज्ञाच्या मते अतिवृष्टीनंतर हेच स्पष्टपणे समोर आलं आहे की पाणी वाहून जाण्यास जागा न ठेवल्यामुळे नदीचे पात्र बदलले. रस्ते पुलांचे बांधकाम होताना पाण्याचा निचरा करण्याबाबत विचार केला गेला नाही. शिवाय मुख्य पात्राऐवजी चोरट्या मार्गाने वाळू उपसा झाल्यामुळे देखील मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
या सगळ्या नुकसानीला जलयुक्त शिवारची कामं जबाबदार आहेत असं पर्यावरणतज्ज्ञांनी म्हटल्यानंतर ज्या भाजपच्या सरकारच्या काळात ही कामे झाली. ज्या मंत्र्यांच्या अखत्यारीत जलयुक्तची कामे झाली. त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या. माजी मंत्री राम शिंदे यांनी जलयुक्त शिवाराची कामं या नुकसानीला जबाबदार नसल्याचे म्हणत पर्यावरण तज्ञांचा दावा फेटाळला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, जलयुक्त शिवारची काम ही नियमांच्या बाहेर केली नाहीत. जलयुक्तच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हा दावा पंकजा मुंडे यांनी फेटाळला आहे. एखाद-दुसरं खराब काम झालं असेल त्यामुळे सगळीच कामांमुळे असं झालं असं म्हणणं योग्य नाही. उलट दुष्काळात जलयुक्तने मराठवाड्याला मदतच केली आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.