एक्स्प्लोर
दुष्काळात तेरावा महिना, डाळींचे दर भडकले!
मुंबई : दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणतात, त्याचा अनुभव सध्या राज्यातील लोक घेत आहेत. कारण एकीकडे पाण्यासाठी वणवण सुरु आहे, तर दुसरीकडे हिरवा भाजीपाला पाणी नसल्यानं बाजारात नाही, आणि जो आहे, तो प्रचंड महाग आहे.
डाळींच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ
त्यामुळं पोटाला आणि बजेटला आधार म्हणून असलेल्या डाळींच्या दरांनीही उचल खाल्ली आहे. किरकोळ बाजारात डाळींचे दर 15 ते 20 टक्के दरांनी वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांचे प्रचंड हाल होणार असं दिसतं आहे.
किरकोळ बाजारात डाळींचे भाव
किरकोळ बाजारात तुरीच्या डाळीनं 180 रुपयाचा दर गाठला आहे. चनाडाळ किरकोळ बाजारात 120 रुपयांवर पोहोचली आहे. मूगाची डाळ 135 रुपये किलो, उडीद डाळ 200 ते 220 रुपये किलो, तर मसूर डाळ किमान 100 रुपयांवर पोहोचली आहे.
दुष्काळामुळे भाज्यांची आवक घटली
दुष्काळामुळे भाज्यांची आवक घटली असून, आता डाळींचे दर गगनाला भिडल्यानं वरण आणि आमटीही लोणच्यासारखी तोंडी लावल्यासारखीच खावी लागणार आहे.
दुष्काळाचा डाळींवर परिणाम
देशातील 10 राज्य सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचाही समावेश आहे. त्यामुळं यंदा उत्पादन घटल्याचा मोठा परिणाम डाळींचे दर भडकण्यावर झाला आहे.
भारत हा जगातला सर्वात मोठा डाळ उत्पादक देश
भारत हा जगातला सर्वात मोठा डाळ उत्पादक आणि डाळ खाणारा देश आहे. इतकंच नव्हे तर म्यानमार, टांझानिया, अमेरिका, ऑस्ट्रेलियातून सर्वाधिक डाळही भारतच आयात करतो
भारताला वर्षाला 2 कोटी 20 लाख टन डाळीची आवश्यकता
भारताला वर्षाला 2 कोटी 20 लाख टन डाळीची आवश्यकता असते. दुष्काळामुळं यंदा डाळीचं उत्पादन केवळ 1 कोटी 85 लाख टन झालं आहे. म्हणजे जवळपास 55 लाख टन इतका डाळीचा तुटवडा आहे.
डाळींचे दर भडकू नयेत म्हणून साठेबाजीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. चारच महिन्यांपूर्वी सरकारनं 8 हजार कोटींची डाळ जप्तही केली होती. मात्र ती बाजारात आली किंवा नाही? याबाबत शेवटपर्यंत साशंकता राहिली.
डाळ निर्यातीचे निर्बंधही वेळेत घालण्यात आले नाहीत. शिवाय आयातीचा निर्णयही वेळेत घेतला नाही, यामुळंही डाळींच्या दरांनी उचल खाल्ली आहे. शिवाय डाळ उत्पादन वाढीस लागावं म्हणून गेल्या 60 वर्षात फारसे प्रयत्न झाले नसल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.
यंदाच्या हंगामात डाळीचं उत्पादन कमी झालं असलं तरी डाळीचे दर स्थिर राहतील, असं अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement