(Source: ECI/ABP News/ABP Majha)
....आणि चक्रीवादळातही 'ती' आनंदाने भारावून गेली!
एकीकडे प्रसुती कळा आणि दुसरीकडे कोपलेल्या निसर्गाचं रौद्ररुप देविकासमोर उभं ठाकलं होतं. जुन्या जाणत्या आजीबाईंनी त्या छोट्याशा खोलीत बाळंतपण सुखरुप पार पाडलं आणि देविकाने एका गोंडस परीला जन्म दिला.
रायगड : कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने घातलेल्या थैमानामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पत्ते-पानांप्रमाणे संपूर्ण घरासह संसार आकाशात उडताना पाहायला मिळत होता. या कोपलेल्या निसर्गाला रोखण्याची दानत कोणाचीच नव्हती. मात्र अशा वादळातही एक माता मात्र आनंदाने भारावून गेली.
ही घटना आहे रायगड जिल्ह्यातील म्हणजे ज्या भागात हे चक्रीवादळ धडकलं त्याच हरिहरेश्वर भागातील. या मातेचं नाव आहे देविका. देविका खेडे या 22 वर्षाच्या मुलीचं सासर हरिहरेश्वर मंदिराच्या अगदी जवळ आणि तिचं माहेरही या हरीहरेश्वर मंदिरापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर असलेलं मारळ गाव. देविका गरोदर होती. नववा महिना सुरु होता. परंपरेप्रमाणे पहिल्या बाळंतपणासाठी सासरच्या मंडळींनी माहेरी सोडलं. देविकाला दोन बहिणी. मात्र त्यांचीही लग्न झाल्यामुळे त्या त्यांच्या गावी. घरात फक्त देविका आणि तिची आई दर्शना. दिवस पूर्ण होण्यासाठी अवघे काही तास बाकी होते. दवाखान्यात नेऊन दाखल करायचं, असं सर्व काही ठरलं. पण कशाचं काय, सरकारी यंत्रणा गावात येऊन ओरडू लागली. "चक्रीवादळ गाव आणि परिसरात धडकणार आहे. कोणीही घरातून बाहेर पडू नका. कौलारु आणि विट मातीच्या घरात राहू नका." देविका आणि तिच्या आईला काय करावं सूचत नव्हतं.
चक्रीवादळ गावावर धडकणार तो दिवस उजाडला. नुसता उजाडला नाही, तर त्याच दिवशी सकाळपासून देविकाला प्रसुती कळा सुरु झाल्या. दुसरीकडे वाऱ्याचा वेग मिनिटामिनिटाला वाढत होता तर दुसरीकडे देविकाला वेदना असहाय्य होऊ लागल्या. देविकाच्या आईच्या अंगावर काटा उभा राहिला होता. खिडकीतून बाहेर डोकावलं तर रस्त्यावर वाऱ्याच्या आवाजाव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. सर्वांनी दार खिडक्या लावून घेतल्या होत्या. देविकाचा जीव कासाविस होत होता. तिच्या वेदनांकडे पाहून आईला राहावलं नाही. ती त्या वाऱ्याच्या झोकातच घरातून बाहेर आली. तोपर्यंत वाऱ्याने आपलं रौद्ररुप धारण करायला सुरुवात केली होती. वाऱ्याच्या वेगाने घरावरच्या छोट्या मोठ्या वस्तू रस्त्यावर फेकायला सुरुवात केली होती. बाहेर येऊन त्यांनी काही लोकांना मोठमोठ्याने आवाज दिला. वाऱ्याच्या आवाजाने काहींना आवाज आला नाही तर काहींना आवाज आला. जे आले त्यांना सर्व प्रकार समजला. काही लोक धाडसाने या वादळात रस्त्यावर आले. समुद्राच्या किनारी वाऱ्याचा वेग असा कोणी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे देविकाला दवाखान्यापर्यंत कोणत्याच वाहनातून घेऊन जाणं शक्य नव्हतं.
त्यात दुसरं संकट समोर ठाकलं. ज्या घरात देविका होती, त्याच घरावरचे सिमेंटचे पत्रे पानांसारखे हवेत उडाले. वादळ आणि पाऊस घरात घुसला होता. देविका पुरती चिंब भिजली होती. एका बाजूला घरावरचं छ्प्पर गेलं तर दुसरीकडे प्रसव कळा. त्यातही काहींनी धाडसाने देविकाला गावातीलच एका आरसीसी बांधकाम असलेल्या घरातील टॅरेसवरच्या खोलीत नेलं. जुन्या जाणत्या म्हाताऱ्या दोन आज्जींना कसंबसं बोलावून आणलं. पहिलीच डिलिव्हरी असल्यामुळे मरणयातना देणाऱ्या कळा आणि कोपलेल्या निसर्गाचं हे रौद्ररुप देविकासमोर उभं ठाकलं होतं.. जुन्या जाणत्या आजीबाईंनी त्या छोट्याशा खोलीत बाळंतपण सुखरुप पार पाडलं आणि देविकाने एका गोंडस परीला जन्म दिला.
या जगात या बाळाने पाऊल ठेवलं तेव्हा हा निसर्ग जणू थैमान घालून आपल रौद्ररुप दाखवत होता. पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी' असंच काहीसं देविकाच्या बाबतीत घडलं. आज बाळ आणि बाळाची आई सुखरुप आहे. अंगावर काटे आणणारी ही परिस्थिती देविका आणि तिची आईच्या कायम लक्षात राहिल हे तितकचं खरं. आता या चिमुकल्या परीचं नावही या चक्रीवादळाशी साजेसं असेल, अस देविकाची आई दर्शना सांगते.
WEB EXCLUSIVE| निसर्ग'चा धुमाकूळ सुरु असतानाच देविकाची प्रसुती; रायगडच्या हरिहरेश्वरमधील थरारक कहाणी